शिर्डी : चुकीचा संदर्भ देणार्‍यांची चौकशी व्हावी

0

जन्मगावाचा वाद : शिर्डी ग्रामस्थ करणार संस्थानकडे मागणी

शिर्डी (प्रतिनिधी)- साईबाबा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावातील होते. त्यामुळे शिर्डीबरोबरच पाथरीचाही विकास व्हावा अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी समाधी शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगीच्या भाषणात व्यक्त केली. त्यामुळे त्यांना चुकीचा संदर्भ देणार्‍यांची त्वरीत चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

साईचरित्र ग्रंथात साईबाबांच्या जन्मस्थळाचा असा कोणताच उल्लेख नाही.त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून राष्ट्रपतींना ही माहिती कुणी पुरविली, साईबाबा संस्थानच्या पदाधिकार्‍यांनी याबाबत काही वेगळी माहिती दिली का याबाबत साईभक्तांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

यासंदर्भात शिर्डी ग्रामस्थ याबाबत संस्थान प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे खात्रिलायक वृत्त आहे.
साईबाबांचा सर्वधर्मीयांवर प्रभाव आहे. ‘सबका मालिक एक’, ‘श्रध्दा और सबुरी’ हा महामंत्र बाबांनी आपल्या भक्तांना दिला.

साईबाबांनी आपला धर्म, जात आणि नाव कोणालाही सांगितले नाही. साईचरित्र ग्रंथातही साईबाबांच्या मुळ गावाचा उल्लेख आढळत नाही. साईचरीत्रातील तिसर्‍या अध्यायामध्ये म्हटले आहे एक देखणा मुलगा शिर्डीतील निंब वृक्षाखाली तपस्येला बसला आहे.

तो स्वतःचे, आईवडीलांचे नाव सांगत नाही. कुठल्या गावाचा व जातीचा हेही सांगत नाही.मग राष्ट्रपतींना कुणाकडून चुकीची माहीती देण्यात आली. याबाबत शोध घेण्याची मागणी साईभक्तांमधून होत आहे.

साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आजपर्यंत कुणीही बाबांच्या जन्मगाव, जात, धर्म याबाबत वाच्यता केली नाही. राष्ट्रपतींना याबाबत कुणी माहिती दिली. ती कशाच्या आधारे दिली याची विचारणा आम्ही शिर्डी ग्रामस्थ संस्थानच्या कार्यकारी अधिकार्‍यांना भेटून करणार आहे. साईबाबा हे सर्वधर्मचे प्रतिक आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना चुकीची माहिती पुरविणार्‍याचा शोध घेऊन त्याची चौकशी करावी. चुकीची माहिती देणामागे उद्देश काय. चुकीची माहिती देणार्‍यांवर कडक शासन झाले पाहीजे.
-जगन्नाथ गोंदकर, उपनगराध्यक्ष

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील बाबा महाराज साईबाबांचे गुरू होते असे सांगितले जाते. बाबा महाराजांनी परभणीतील सेलु येथे 1803 साली समाधी घेतली. 1918 ला साईबाबांचा जन्म झाला. तेव्हा 1803 साली साईबाबा हयात असण्याचा प्रश्‍नच येत नाही. तेव्हा बाबा महाराज व साईबाबा यांची गुरूशिष्य असल्याचे प्रमाणच सिद्ध होत नाही. या सर्व बाबी तर्कावर आधारीत आहे.

साईबाबा सर्वधर्मीयांचे प्रतिक आहे. साईबाबा शिर्डीत आले तेव्हा त्यांनी आपले नाव, गाव, जातीचा उल्लेख केला नाही. पाथरी हे साईबाबांचे जन्मगाव आहे ही माहिती चुकीची आहे. राष्ट्रपतींना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. साईबाबांनी कधीही जात, पात धर्म मानले नाही.
अशोक खांबेकर
माजी विश्‍वस्त, साईबाबा संस्थान

LEAVE A REPLY

*