साईसच्चरित पारायण सोहळ्याची सांगता

0

श्रींच्या ग्रंथाची मिरवणुक; हजारो साईभक्तांचा सहभाग

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबा संस्थान, नाट्यरसिक संच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने सोमवार दि. 24 जुलै 2017 ते मंगळवार दि. 1 ऑगस्ट 2017 या कालावधीत हनुमान मंदिराशेजारील प्रांगणात साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पारायण सोहळ्यात हजारो महिला तसेच पुरूषांनी भाग घेतला होता. या सोहळ्याची सांगता समारोप सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
सोमवारी सकाळी 7 ते 8.30 या वेळेत पुरूषांनी अध्याय क्रमांक 53 अवतरणीकेचे वाचन केले तर 8.30 ते 9 यावेळेत महिलांनी अध्याय क्रमांक 53 अवतरणीकेचे वाचन करून ग्रंथ समाप्ती करण्यात आली. दुपारी 3.30 ते सायं. 7.30 यावेळेत श्रींच्या ग्रंथाची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रंथ मिरवणुकीत पारंपारीक वेशभुषा धारण करून चिमुरड्या मुलांनी पथनाट्य सादरीकरण केले.
तर महिलावर्गाने एकरंगी साड्या परीधान करून मस्तकी फेटा बांधल्याने मिरवणुकीची शोभा वाढविल्याचे चित्र बघायला मिळाले. त्याचप्रमाणे पुरूषांनी सफेद रंगाचे वस्र परीधान केले होते. मिरवणुकित हजारोंच्या संख्येने पारायणार्थीनी सहभाग दर्शविला. मिरवणुकीची शोभा वाढण्यासाठी उंट, ढोल ताशा, संबळ, बँन्डपथकांनी सहभाग नोंदवला होता. कालावधीत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
श्रावण मासानिमित्त साईबाबा संस्थान व नाट्यरसीक संच आयोजित व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पारायण सोहळ्याचे यंदाचे हे 23 वे वर्ष होते. या पारायण सोहळ्यानिमित्त दररोज कीर्तन, प्रवचन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्रौ 8 ते 10 यावेळेत क्रिएशन, कुडाळ यांचा उत्सव महाराष्ट्राचा संकल्प कार्यक्रम झाला.
मिरवणुक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे व कर्मचारी तसेच वाहतुक शाखेच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पॉ.कॉ. संजय शिंदे, पॉ.कॉ. दादासाहेब गुंड, पॉ.कॉ. मारूती घुगे, पॉ.कॉ. सुधाकर काळोखे आदी उपस्थीत होते.

 

LEAVE A REPLY

*