शिर्डी : ग्रामस्थ व संस्थान प्रशासनाची 13 नोव्हेंबरला बैठक

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साई पादुका दर्शनासाठी बाहेर नेऊ नयेत या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या छत्रपती शासनच्या कार्यकर्त्यांना संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी 13 रोजी बैठक घेण्याचे अश्‍वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
दरम्यान 13 रोजी होणार्‍या बैठकीत संस्थान व ग्रामस्थ एकत्रित भूमिका मांडणार असून त्यात होणारे निर्णय सर्वांना मान्य असतील अशी भूमिका यावेळी शिर्डीकरांनी स्पष्ट केली. दरम्यान सोमवारी पादुका घेऊन साईरथ चेन्नईकडे निर्विघ्नपणे रवाना झाला.
यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक अभय शेळके, नितीन कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, ज्ञानदेव गोंदकर, विजय कोते, संजय शिंदे, गजानन शेर्वेकर, सर्जेराव कोते, नीलेश कोते, सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सचिन शिंदे, तुकाराम गोंदकर, बाबासाहेब कोते, प्रमोद गोंदकर, सचिन कोते, रवि कोते, अमोल गायके, भाऊ शिरगावकर, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
रविवारी रात्री 11 वाजता सर्वपक्षीय ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये यापुढील काळात गावच्या हितासाठी जो काही सर्वानुमते निर्णय होईल, तो अंतिम असेल. नंतर कोणाचाही विरोध ग्राह्य धरला जाणार नाही यावर एकमत होऊन शिक्कामोर्तब करण्यात आले.
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून आंदोलनाबाबत माहिती देण्यात आली. डॉ. हावरेंनी भ्रमणध्वनीवरूनच आश्वासन दिले. येत्या 13 तारखेस ग्रामस्थ व विश्वस्तांची बैठक घेऊन या प्रश्‍नावर सामंजसपणाने तोडगा काढू. पादुका दर्शनासाठी चैन्नई दौर्‍याचे नियोजन अगोदरच आहे.
त्यामुळे अचानक दौरा रद्द करणे शक्य नाही. ग्रामस्थांच्या मागण्यांसदर्भात 13 रोजी होणार्‍या बैठकीत जो निर्णय होईल तो संस्थान प्रशासनाला मान्य राहील. तेव्हा चेन्नई येथे साईपादुका जाऊ द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले. यावर ग्रामस्थांनी होकार देत 13 रोजीच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगत तरुणांना उपोषण मागे घेण्यास प्रवृत्त केले. ज्येष्ठाचा मान राखत तरुणांनीही तूर्त उपोषण मागे घेतले. दरम्यान सोमवारी सकाळी साईबाबांचा पादुका रथ शिर्डीतून चेन्नईसाठी रवाना करण्यात आला.

साईसमाधी शताब्दीनिमित्ताने साईबाबांचा प्रचार व प्रसार व्हावा ही ग्रामस्थांची इच्छा आहे. संस्थानने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र पादुका बाहेर नेताना त्यांचे पावित्र्य राखले जावे ही शिर्डीकरांची प्रामाणिक इच्छा आहे. 13 रोजी होणार्‍या बैठकीत पादुका दौर्‍यांसबधी निश्‍चित अचारसंहिता तयार करून तिचे पालन व्हावे. कोणत्याही खाजगी व्यक्ती किंवा राजकीय पदाधिकार्‍यांचे हित पाहून दर्शन सोहळा आयोजित होणार नाही याची दक्षता घ्यावी.
-नितीन कोते
युवक कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, शिर्डी

LEAVE A REPLY

*