साईनगर-पंढरपूर एक्सप्रेस चार महिन्यांसाठी रद्द

0
राहुरी स्टेशन (वार्ताहर) – मध्यरेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर-दौंण्ड रेल्वेमार्गावरील कामकाजाकरीता बुधवार 1 नोव्हेंबरपासून ब्लॉक देण्यात आल्याने साईनगर-पंढरपूर एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी रेल्वे प्रशासनाने 4 महिन्यांसाठी रद्द केल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर-कुर्डूवाडी-दौंड या रेल्वे मार्गावरील वाशिंबे व जेऊर दरम्यान कामासाठी रोज 1 तास 45 मिनिटांचा ब्लॉक देण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून साईनगर-पंढरपूर ही आठवड्यातून तीन वेळा जाणारी रेल्वेगाडी व पुणे-सोलापूर इंटरसिटी ही रोज जाणारी रेल्वे गाडी 125 दिवसाकरीता म्हणजे सुमारे चार महिन्यांकरीता रद्द करण्यात आली आहे.
तसेच पुणे- सोलापूर, पुणे- हैदराबाद आदी रेल्वेगाड्या शॉर्टटर्मिनेट करण्यात आल्या आहेत. तर अमरावती-पुणे ही आठवड्यातून दोन वेळा धावणारी रेल्वेगाडी एक तास उशिराने धावणार आहे. या रेल्वेगाडीला थांबा कायम होण्याचे संकेत रेल्वे विभागाकडून मिळत होते. या दरम्यानच गाडीचा थांबा कायम होण्याऐवजी गाडीच रद्द झाल्याने प्रवासी व भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
साईनगर-पंढरपूर एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला अथक प्रयत्नाने थांबा मिळाला असून रेल्वे प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने थांबा कायम होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु ही रेल्वेगाडी चार महिन्यांकरीता रद्द झाल्याने प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे, उपाध्यक्ष मुखतार सय्यद, सचिव मंगल जैन, सल्लागार बाळासाहेब पेरणे, निसार सय्यद, विनित धसाळ, सदस्य अनिल इंगळे, सुनील मोरे, इश्‍वर सुराणा, आय्युबखान पठाण यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*