साईबाबा पतसंस्थेत कोट्यवधीचा गफला

0
मॅनेजर, कॅशियर विरोधात गुन्हा दाखल 
साकुर (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील शाखा साकूर येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा 2 कोटी 16 लाख 61 हजार 916 रूपयाचा घोटाळा उघडकीस आला आहे. पतसंस्थेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईबाबा पतसंस्थेत ठेवीदारांचे पैसे मुदत संपूनही मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी ठेवीदारांनी संगमनेर येथे उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. उपनिबंधक व पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.
उपनिबंधक यांनी लेखी पत्रात म्हटले होते की, पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले असून यामध्ये गैरव्यवहार आढळून आला आहे. त्यामुळे पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी ठेवीदारांच्या रकमा परत कराव्यात. तसेच लेखा परीक्षणाचा अहवाल आल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल.
तसेच अध्यक्ष यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले होते की, ठेवीदारांची 50 टक्के रक्कम येत्या तीन महिन्यात देणार असून त्यानंतर एक महिन्याने उर्वरित रक्कम देण्यात येईल. या दोघांनीही लेखी आश्‍वासन दिल्यानंतर ठेवीदारांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले होते.
पतसंस्थेत मॅनेजर व कॅशियर यांनी संगनमताने अधिकाराचा दुरूपयोग करून काही पावत्यांवर, चेकवर खोट्या सह्या करणे, संस्थेत जमा झालेल्या रोख रकमा तसेच ठेवी बँकेमध्ये भरणा न करणे, मुदतपूर्व ठेवीच्या रकमा संचालक मंडळाचे ठरावाशिवाय खोटे ठराव करून परस्पर पैसे काढून पतसंस्थेच्या डे बुकला नोंद न करणे,

शाखा साकुर येथील जिल्हा बँकेच्या लॉकरमधे ठेवलेल्या संस्थेचे सोन्याचे दागिने परस्पर काढुन स्वतःचे फायद्याकरीता वापरून 2 कोटी 16 लाख 61 हजार 916 रूपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षक संतोष रंगनाथ पंधारे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मॅनेजर रावसाहेब कारभारी टेकुडे (रा. टेकुडेवाडी, देसवडे), कॅशियर सिताराम मनोहर शेंडगे (रा. मांडवे बुद्रूक) यांच्याविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 49/17 भारतीय दंड संहिता 420, 403, 405, 409, 467, 468 व 471 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट करत आहे.

LEAVE A REPLY

*