स्वच्छतेसाठी साईसंस्थान शिर्डी नगरपंचायतीला दरमहा 35 लाख देणार

0
शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी शहराची साफसफाईची जबाबदारी बीव्हीजी कंपनीला पुढील 5 वर्षांसाठी देण्यात आली आहे. याबाबत शिर्डी नगरपालिका आणि बीव्हीजी यांच्यात करार झाला असून स्वच्छतेपोटी साईबाबा संस्थान शिर्डी नगरपंचायतीला दरमहा 35 लाख रुपये देणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. योगीता शेळके यांनी दिली.
शिर्डी नगरपालिका दरमहा 7.5 लाख रुपये व संस्थानचे 35 लाख असे एकूण रुपये 42.5 लाख रुपये मासिक खर्च करून शिर्डी शहर साफ स्वच्छ व सुंदर ठेवले जाणार आहे. यासाठी शिर्डी शहरातील सर्व 17 वॉर्डात 17 घंटागाड्या प्रत्येक घरोघरी जाऊन कचरा विलगीकरण करून गोळा करणार आहेत. शहरात व्यवसाय करणार्‍या छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा कचरा थेट ते करत असलेल्या व्यवसायाच्या ठिकाणाहून गोळा करणार आहेत.
शिर्डी शहरातील सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंटचा कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर उप्लब्ध असणार आहेत. शिर्डी शहर साफसफाई करण्यासाठी 30 कर्मचारी संपूर्ण 24 तास शहरातील मुख्य परिसर झाडू मारून स्वच्छ करणार आहेत. शहरातील प्रत्येक वॉर्डमधील उपनगरांची सर्वत्र साफसफाई व्हावी म्हणून 19 स्वच्छता कर्मचार्‍यांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे.
नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, शिर्डी शहर व परिसरात साथीचे आजार उद्भवू, नयेत म्हणून शहरात सर्वत्र वेळोवेळी औषध फवारणी नियमितरीत्या व्हावी म्हणून तसा करारदेखील करण्यात आला आहे.
नगरपालिकेच्या माध्यमातून शहर साफ स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून नगराध्यक्षा योगीता शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, मुख्याधिकारी सतीश दिघे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, सुधाकर शिंदे, पतिंगराव शेळके, विजय कोते, रमेश गोंदकर गटनेते अशोक गोंदकर, सभापती सुजित गोंदकर, सचिन कोते, संगीता शेजवळ, सविता शेजवळ, नगरसेवक अभय शेळके, मंगेश त्रिभुवन, दत्तात्रय कोते, श्रीमती अर्चना कोते, छायाताई शिंदे, कविता निकम, ताराचंद कोते, बाबुलाल शेख आदींनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी शहर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्याकडून साईबाबा संस्थानच्या माध्यमातून आर्थिक मदत घ्यावी यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांशीही त्यांनी चर्चा केली होती.त्यानुसार शिर्डी शहर साफसफाईसाठी साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निधी मंजूर केला आहे.
ः सौ. योगीता शेळके, नगराध्यक्षा

LEAVE A REPLY

*