शिर्डीत गर्दीचा उच्चांक : साईभक्तांचे हाल; ग्रामस्थांनी टाईम दर्शन व्यवस्था बंद पाडली

0
शिर्डी (प्रतिनिधी) – शनिवार व रविवारच्या दोन दिवस सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत गर्दीचा उच्चांक झाला. या गर्दीने संस्थान प्रशासनाच्या नियोजनाचा बोजवारा उडाला. टाईम दर्शन व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला. चार चार तास रांगेत उभे राहुनही दर्शन पास मिळत नसल्याने भाविकांचे हाल झाले. हे बघून संतापलेल्या ग्रामस्थांनी टाईम दर्शन व्यवस्था बंद पाडली. टाईम दर्शनामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.
शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली. गर्दीमुळे दर्शन रांगेत लागण्यापूर्वी टाईम दर्शनच्या पासेससाठी भाविकांना मोठमोठ्या रांगांचा सामना करावा लागला. श्रीराम पार्कींग व साईउद्यान मधील केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली. यात वृद्ध, महिला, लहान मुले, अपंगाचे हाल झाले.

श्रीराम पार्किगमध्ये अनवानी चालणार्‍या भाविकांना खडीचा त्रास सहन करावा लागला. याबाबत माहिती मिळताच नगरसेवक अभय शेळके, अशोक गोंदकर, प्रमोद गोंदकर, सुधाकर शिंदे आदींनी भाविकांचे होणारे हाल बघून टाईम दर्शन सुविधा बंद पाडली. थेट भाविकांना दर्शनरांगेत जाण्याचे आवाहन केले.

यामुळे भाविकांना टाईम दर्शनच्या पासेससाठी रांगा लावण्याचा त्रास वाचला. उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर व पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यंत्रणा कोलमंडलेली पाहुन त्यांनी टाईम दर्शन पासेस तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकारी व ग्रामस्थांनी दर्शन रांगामध्ये जावून व्यवस्थित रांगा लावण्यासाठी सुरक्षा रक्षकांना मदत व मार्गदर्शन केले.

यानंतर समाधी मंदिरात पुजार्‍यांची संख्या वाढवण्यात आली. यामुळे दर्शन रांगा सुरळीत वेगाने चालू लागल्या. आरतीपूर्वी मंदीर स्वच्छतेसाठी मंदीर रिकामे करण्याचा कालावधीही कमी करण्यात आला. यामुळे जास्तीत जास्त भाविक दर्शन घेऊन बाहेर पडले. दर्शन व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांच्या हॉटेलमध्ये ग्रामस्थांची उपकार्यकारी अधिकारी आहेर यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष कैलास कोते, पतिंगराव शेळके, अशोक गोंदकर, प्रमोद गोंदकर, सुजीत गोंदकर, नितीन उत्तम कोते, दत्तात्रय कोते उपस्थित होते. दर्शन पास संदर्भात भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी अनेकवेेळा तक्रारी केल्या. मात्र संस्थान प्रशासनाने याकडे डोळझाक केली. गर्दीमुळे कोलमोडलेली यंत्रणा व साईभक्तांचे होणार हाल पाहुन, याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून व काही ग्रामस्थांना बोलावून टाईम दर्शनाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन संस्थान प्रशासनाच्या वतीने यावेळी देण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

*