साई अतिथी गृहाजवळ अद्यापही दर्शन काउंटर नाही

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी)- संस्थानच्या वतीने श्रीराम पार्कींगमध्ये सुरू करण्यात आलेल्या टाईम दर्शन काउंंटरवर मागील आठवड्यात हजारो साईभक्तांनी गर्दी केल्याने टाईम दर्शन व्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते.
साईभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून जुन्या प्रसादालयाजवळील साईनिवास अतिथीगृहाजवळ पर्यायी टाईम दर्शन पास वितरणाचे काउंटर तातडीने सुरू करण्याचे आदेश डॉ. हावरे यांनी संस्थान प्रशासनास दिले होते. मात्र अद्यापपर्यत याठिकाणी काउंटर सुरू न झाल्याने त्यांच्या आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.
मागील वर्षी जुन्या साईप्रसादालयाच्या इमारतीत 12 डिसेंबरला टाईम दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आलेली होती. त्यामुळे साईभक्तांच्या दर्शनाचे नियोजन संस्थानने करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र या बारा महिन्यांत टाईम दर्शन व्यवस्थेचे बारा वाजल्याने साईभक्तांना तासंनतास रांगेत उभे राहाण्याचा त्रास आजही सहन करावा लागत आहे. संस्थान अध्यक्षांनी टाईम दर्शन काउंटर पुन्हा पूर्व जागेत स्थलांतरीत करण्याचा आदेश दिला असताना प्रशासनाकडून अद्यापपावेतो कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासन आणी विश्वस्तांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येते.
साईसमाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने जुन्या साईप्रसादालयाच्या जागेवर साईभक्तांकरिता अद्ययावत, वातानुकुलित 30 हजार साईभक्तांची व्यवस्था होईल अशा नविन दर्शन रांगेचे काम सुरू करण्यात आले असून पुढील वर्षाभरात हे काम पूर्ण होईल.
साईसमाधी शताब्दीनिमित्ताने वर्षभरात भक्तांचा ओघ शिर्डीत असणार आहे. मात्र या अत्याधुनिक दर्शनरांगेच्या इमारतीचे काम एक वर्षाने पूर्ण होणार असल्याने शताब्दीवर्षात साईभक्तांना याचा फायदा होणार नाही. त्यामुळे या तात्पुरत्या टाईम दर्शन व्यवस्थेचा भक्तांना कितपत फायदा होईल ही शंकाच आहे.

LEAVE A REPLY

*