लाखो भाविकांनी घेतले साई समाधीचे दर्शन

0

आज सांगता : दीपोत्सवाचा चलचित्र देखावा व विद्युत रोषणाई ठरले आकर्षण

शिर्डी (प्रतिनिधी) – श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर साई मंदिर दर्शनाकरिता खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. शनिवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे काकडा आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्ती झाली. श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची द्वारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, विश्वस्त अ‍ॅड. मोहन जयकर, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, सौ. नलिनी हावरे, सौ. स्मिता जयकर व सौ. सरस्वती वाकचौरे हे सहभागी झाले होते. तर संरक्षण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गंगावणे यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले व खरेदी विभागाचे अधीक्षक अविनाश कुलकर्णी यांनी श्रींची प्रतिमा व वैद्यकीय अधीक्षिका सौ. मैथिली पितांबरे यांनी पोथी घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.

संस्थानचे मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे व त्यांची सुविद्य पत्नी सौ.प्रतिक्षा घोरपडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा करण्यात आली. वरिष्ठ लेखापाल वसंतराव जेजूरकर यांच्या हस्ते व्दारकामाई मंदिरातील गव्हाच्या पोत्याची पूजा करण्यात आली. भांडार अधिक्षक अशोक झुरंगे यांच्या हस्ते लेंडीबागेतील ध्वजाचे पूजन करण्यात आले. शनिवारी सकाळी 10 वाजता विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्मावर कीर्तन झाले. मध्यान्ह आरतीपूर्वी रासने कुटुंबीय व देशपांडे (निमोणकर) कुटुंबीय यांच्यावतीने नवीन निशाणांची विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 4 वाजता मिरवणूक काढण्यात आली. सायं. 5 वाजता श्रींच्या रथाची शिर्डी गावातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. सायं. 6 वाजता मंदिर प्रमुख रमेश चौधरी व त्यांची सुविद्य पत्नी सौ. अलका चौधरी यांच्या हस्ते श्रींची पाद्यपुजा करण्यात आली. सायं.6.30 वाजता श्रींची धुपारती झाली. सायं. 7.30 ते 10.15 यावेळेत सुदेश भोसले, मुंबई यांचा भावगीत/भक्ती संगीत या कार्यक्रमास श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रात्री 11.00 ते पहाटे 5.00 यावेळेत श्रींचे समोर कलाकार हजेरी कार्यक्रम झाला. रात्रभर समाधी मंदिर खुले ठेवल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

फुलांची सजावट
नागपूर येथील साईभक्त श्रीमती रिम्पल लोहिया यांच्या देणगीतून समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या फुलांच्या आकर्षक सजावटीने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतले तर मुंबई येथील व्दारकामाई मंडळाने उभारलेले श्री साईसच्चरित या ग्रंथातील अध्याय क्रमांक 5 मधील प्रसंगावर अधारित श्री साई समर्थ हा भव्य देखावा आणि लेडींबागेतील व्दारकामाई मंदिरातील दिपोत्सवाचा चलचित्र असलेला देखावा व विद्युत रोषणाई उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले.

आज समारोप
रविवारी उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे 5.05 वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 6.30 वा. गुरुस्थान मंदिरामध्ये रुद्राभिषेक, सकाळी 10.30 वा. विक्रम नांदेडकर यांचे गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.10 वा. माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायं. 6.30 वा. धुपारती होईल. रात्रौ 7.00 ते 10.00 यावेळेत कैलास हरेकृष्णा दास, नागपूर (इंटरनॅशनल आर्टीस्ट आकाशवाणी रेडीओ सिंगर) यांचा साई भजन संध्या हा कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर होणार आहे. रात्रौ 10.30 वा. श्रींची शेजारती होईल.

LEAVE A REPLY

*