Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पवित्र प्रणालीद्वारे पात्र ठरलेल्या प्राथमिक स्तरावरील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती

Share

संगमनेर (वार्ताहर):- पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षकांना अखेर नियुक्ती आदेश देण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तात्काळ पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी संस्थांमधील शिक्षकांची भरती पवित्र प्रणालीद्वारे करण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. या प्रणालीद्वारे पात्र शिक्षक गुणवत्तेच्याआधारे मिळणार आहेत. त्यामुळे या प्रणालीतून शिक्षक नियुक्त करताना खाजगी संस्थांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. अखेर न्यायालयाने खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक भरती करत असताना पवित्र प्रणालीद्वारे उमेदवार देऊन मुलाखती घेण्यास अनुमती दिली होती. या संदर्भाने राज्य शासनाने तात्काळ कार्यवाही केली.

तथापि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त करण्यात येणार्‍या प्राथमिक शिक्षकांची निवड केवळ पवित्र प्रणालीद्वारे गुणवत्तेच्या आधारे करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला होता. तथापि राज्यातील काही खासगी शिक्षण संस्थांनी देखील मुलाखतीशिवाय शिक्षक नियुक्त करण्याच्या संदर्भाने शासनाला कळविले होते. शासनाच्या या प्रक्रियेच्या अधीन राहून ज्या संस्थांनी मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीला प्राधान्य दिले होते.त्यांनाही राज्यशासनाने निवड यादी निश्चित करून पाठविली होती. तथापि पात्र उमेदवारांची यादी शासनाने यापूर्वीच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. मात्र त्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेमुळे नियुक्ती देण्यात अडचणी निर्माण होत असल्याची बाब लक्षात घेऊन शासनाने नियुक्तीस स्थगिती दिली होती. तथापि 28 तारखेला झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने मांडलेली भूमिका लक्षात घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात कोणतीही अडचण नसल्याची बाब समोर आल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अखेर यासंदर्भातला आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी निश्चित केलेल्या उमेदवारांना 4 सप्टेंबरपासूनच नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात राज्यातील प्राथमिक शाळांना शिक्षक मिळण्याची आशा आता निर्माण झाली आहे.

राज्यात अजूनही सात लाख बेकार
राज्यात सन 2010 नंतर शिक्षक भरती प्रक्रियेस प्रतिबंध करण्यात आला होता. माध्यमिक स्तरावर देखील इंग्रजी, विज्ञान विषय वगळता नियुक्ती न देण्याचे आदेश शासनाने यापूर्वी दिले होते. त्यामुळे 2010 नंतर राज्यात सुमारे सात लाखांहून अधिक उमेदवार डीएड, बीएड पात्रता धारक ठरले आहेत. या उमेदवारांनी पात्रता धारण केली असली तरी त्यांना नियुक्ती मात्र मिळू शकलेली नाही. त्यामुळे अनेकांनी या कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षेचे माध्यम निवडून विविध विभागांत सेवा करणे पसंत केले आहे. राज्यात गेली काही वर्षे पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले अनेक उमेदवार निवडले गेले आहे. त्याचबरोबर तलाठी, एसटी वाहक, ग्रामसेवक यासारख्या विविध पदांवर देखील डीएड, बीएड उमेदवार निवडले गेले आहेत. तथापि राज्यात अद्यापही 7 लाख बेकार पात्रताधारक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

राज्यात सुमारे पावणेसहा हजार उमेदवारांना मिळणार नियुक्ती
राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुमारे पावणेसहा हजार शिक्षकांना नव्याने नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या शिक्षकांना नोकरीत येण्याचे भाग्य मिळाले आहे. शासनाने राज्यातील सर्व भरती राज्यस्तरावरून केली असून जिल्हा निवडण्याचे स्वातंत्र्य मात्र उमेदवारांना देण्यात आले होते. अशा स्वरूपाची भरती राज्यात पहिल्यांदाच केली असून यापूर्वीही भरती स्थानिक पातळीवर निवड मंडळामार्फत करण्यात येत होती. तथापि शिक्षण हक्क कायद्याच्या अस्तित्वानंतर डीएड, बीएड, पात्रता परीक्षा व त्यानंतर टीट्यूड टेस्ट यासारख्या विविध परीक्षांना सामोरे जावे लागले आहे. या परीक्षांच्या गुणवत्तेच्या आधारे या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

माध्यमिक, उच्च माध्यमिकसाठी प्रतीक्षा करावी लागणार
राज्यातील इयत्ता नववी ते बारावीसाठी शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलद्वारे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तथापि अनेक संस्थांनी मुलाखतीचा पर्याय खुला ठेवल्याने त्याची अंतिम गुणवत्ता यादी शासनाकडे पाठविणे संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करणे, गुणवत्ता यादी निश्चित करणे यासारखी कार्यवाही सुरू राहणार आहे. ती कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तथापि काल दिलेल्या शासन आदेशानुसार नववी ते बारावीच्या शिक्षकांना सध्या नियुक्ती देण्यात येऊ नये असे म्हटले आहे. त्यामुळे माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या नियुक्तीला अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल असा अंदाज आहे. मात्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता, ती कार्यवाही विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी पूर्णत्वाला जाईल असा अंदाज आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!