गँगवारमध्ये तुषार ठरला चुकीचा बळी

0
 नाशिकरोड | दि. २६ प्रतिनिधी पंचवटीतील खुनाचा बदला घेण्याच्या खुन्नशीतून झालेल्या गेममध्ये चुकीच्या माहितीमुळे जेलरोड येथे आलेल्या पाहुण्या तुषार साबळेचा हाकनाक बळी गेल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी १२ संशयितांना पंचवटी परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमध्ये तुषार साबळे या युवकाचा काही कारण नसताना बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अक्षय आत्माराम अहिरे (२२, महालक्ष्मीचाळ भद्रकाली), नितीन किरण पवार (१९, बलरंगवाडी), अमोल विष्णु गांगुर्डे (२६), करण राजू लोट (२१, महालक्ष्मीचाळ भद्रकाली) अशा चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काही दिवसांपुर्वी पंचवटी येथे झालेल्या किरण निकम या गुंडाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी निकम गँगने गुरूवारी हा प्रकार केला. यामध्ये मारला गेलेला तुषार साबळे हा केवळ निकम याच्या खुनातील संशयीतासारखा दिसत असल्याच्या चुकीच्या माहितीवरून हा खून झाला. गुंडांच्या या नंगानाचात हकनाक पाहुण्या तुषारचा बळी गेल्याने परिसरात चिड व्यक्त होत आहे.
गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जेलरोड येथील मंगलमूर्तीनगर परिसरातील हर्ष अपार्टमेंटमध्ये राहणारे भाऊसाहेब जाधव यांच्याकडे कसारा येथे राहणारा त्यांचा भाचा तुषार दहावीची परीक्षा दिल्यानंतर सुटी घालवण्यासाठी आला होता. त्यानंतर तो गोसावीनगर येथे राहणार्‍या त्याची आत्या विमल गांगुर्डे यांच्याकडे गेला होता. त्या ठिकाणी आल्यावर त्याचा आतेभाऊ अक्षय जाधव याने दुचाकीवर बसवून मंगलमूर्तीनगर येथे घेऊन गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर जवळच असलेल्या इमारतीच्या बाकड्यावर अक्षय, तुषार व त्याचे काही मित्र बसले व गप्पा मारत असताना अचानकपणे इमारतीच्या पाठीमागील बाजूकडून पांढर्‍या रंगाची ओम्नी व्हॅन, अल्टो कार, इंडिगो कारसह दोन दुचाकीवर तोंडाला काळे फडके बांधून आलेल्या २० ते २५ युवकांनी हैदोस सुरू केला.

सुरुवातीला त्यातील काही जणांनी बंदुकीतून हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केली. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली. बाकड्यावर बसलेले अक्षय, तुषार व त्याचे मित्र आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. तुषारसुद्धा पळत असताना हल्लेखोरांनी त्यावर पाठिमागुन गोळ्या झाडल्या यात जखमी झाल्यानंतर त्याचा पाठलाग करून कोयते, तलवारी व इतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. त्यामुळे तुषार रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळला. तुषार गंभीर जखमी झाल्याचे हल्लेखोरांना समजताच त्यांनी वाहनातून कॅनॉलरोडमार्गे उपनगरच्या दिशेने पलायन केले.
या घटनेनंतर संपूर्ण जेलरोड परिसरात खळबळ उडाली. तसेच पोलीस यंत्रणा हादरून गेली. तीन दिवसांपूर्वीच जेलरोड येथील कारागृहासमोरील कैलासजी सोसायटीमध्ये एका महिलेची अनैतिक संबंधातून हत्या झाली होती. पोलिसांना आरोपी पकडण्यात तात्काळ यश मिळाले. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी झालेल्या तुषारच्या खुनामुळे पोलिसांचे धाबे दणाणले. दरम्यान, या खून प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवून अक्षय आहिरे याच्यासह ४ संशयितांना पंचवटी, भद्रकाली येथून अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तर संशयीतांनीच तुषारचा चुकीचा गेम झाल्याची कबूली दिल्याचे
सुत्रांनी सांगीतले.

चौकशीतून सत्य बाहेर येईल
या खून प्रकरणी साबळे याच्या तक्रादार नातेवाईकाने व्यवस्थीत माहिती न दिल्याने तपासाची दिशा रेंगाळली होती. परंतु मिळालेल्या माहितीनुसार आज प्रथम चौघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर इतर संशयीतांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून प्रथम दर्शनी याचा निमक खूनाशी सबंध असल्याचे समोर येत आहे. अधिक चौकशीत सत्य बाहेर येईल.
– श्रीकृष्ण कोकाटे , उपायुक्त परिमंडळ १

LEAVE A REPLY

*