अंजलीचा आवाज देशभर गुंजला

0
दौलत झावरे

अहमदनगर जिल्ह्याने चंदेरी दुनियामध्ये अनेक कलाकार दिलेले आहेत. नगरच्या भूमिमध्ये जन्मलेल्या सदाशिव अमरापूरकर, मधू कांबीकर, मधुकर तोरडमल आदींनी चित्रपट, नाट्य, गायन, संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवून जिल्ह्याचा झेंडा जगभर उंचावलेला आहे.

आपल्याच मायभूमितून आपल्या सुरेल आवाजाच्या जादूने अंजली गायकवाडने सारेगमप लिटल चॅम्पस 2017 चे विजेतेपद पटकावलेले आहे. अंजली अंगद गायकवाड हिचा आवाज आज अहमदनगरपुरताच मर्यादीत राहिलेला नाही तर देशभर गुंजलेला आहे. त्यामुळे तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गायकवाड कुटुंब मूळचे लातूर येथील रहिवासी आहे. परंतु अंजलीचे वडील अंगद गायकवाड यांचे संगीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या लातूर येथील गुरुंकडे बर्‍याच वेळा जायचे. त्याचवेळी त्यांची नगर येथून तबला शिकण्यासाठी येणार्‍या गृहस्थाबरोबर ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.

एकामागून एक दिवस गेले. त्यानंतर त्या मित्राने एक दिवस गायकवाड यांना नगरला येऊन तुम्ही संगीताच्या तासिका सुरू करा असा सल्ला दिला. तसेच एका ज्युनिअर महाविद्यालयात तुम्हाला अध्यापकाची नोकरीही मिळेल, असे सांगितले. मित्राच्या सल्ल्यानुसार अंगद गायकवाड नगरला आले अन् स्थायिक झाले. काही दिवस चांगले गेले. परंतु ज्या महाविद्यालयात नोकरी करत होते.

ते बंद झाल्याने गायकवाड यांनी सुरू केलेल्या संगीताच्या तासिकांकडे जास्त लक्ष केंद्रीत केले. हे करत असतानाच गायकवाड दाम्पत्याच्या वेलीवर दोन कळ्या उमलल्या. या कळ्यांचे संगोपन करताना त्यांच्यावर बालवयातच संगीताचे संस्कार केले. या संस्कारांमुळे गायकवाड यांच्या दोन्ही मुलींना गायनाची आवड निर्माण झाल्यानेच त्यांच्या दोन्ही मुली आज यशाच्या शिखरावर पोहचल्या आहेत.

अंजलीचे वडील संगीत विशारद असल्यामुळे तिला लहानपणापासूनच घरातच गायनाचे धडे मिळाले. त्यामुळे तीची संगीतातील आवड लहान पणापासूनच वाढत गेली. त्यामुळे ती गायनाकडे वळाली. ज्या वयात मुलांना आपण गोष्टी सांगतो, त्याच वयात अंगद गायकवाड यांनी आपल्या मुलींना अंगाईबरोबरच भावगीते म्हणून त्यांच्यावर गायनाचे संस्कार घडविण्यास सुरुवात केली.

अंजलीने वयाच्या चौथ्यावर्षीच लातूर येथे झालेल्या गायन स्पर्धेत गवळण गाऊन पहिले बक्षीस मिळवून आपल्या आवाजाच्या जादूने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते. हे पहिले बक्षीस तिला ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते मिळाले होते. त्यामुळे तिला आणखीच प्रेरणा मिळाली. त्यानंतर तिने गायनामध्ये जी उभारी घेतली ती आजपर्यंत टिकून आहे.

अंजली व नंदिनी गायकवाड या दोघी बहिणींनी झी युवा वाहिनीची महाराष्ट्र सम्राट ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर या दोन्ही बहिणींची निवड झी टीव्हिवर सुरू असलेल्या सारेगमप लिटील चॅम्प्स या स्पर्धेसाठी झाली होती. त्यामध्ये दोघींनी आपल्या गायनाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.

या स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर नंदिनी या स्पर्धेतून बाहेर पडली. मात्र, त्यानंतर अंजलीने आपल्या आवाजाची जादू व आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची खूणगाठ बांधल्यामुळे तिने यश मिळविले. आज तिच्या आवाजाची जादू देशभर पोहचली आहे.

कष्टाचे फळ मिळतेच : अंजली

माझी आवडती गायीक कौशिकी चक्रवर्ती आहे. तिच्या प्रमाणेच मला गायनात करिअर करायचे आहे. मी बालवयात जे यश मिळविले ते मेहनत व आई-वडील व गुरुजनांविषयी आदर बाळगल्यामुळेच यशाच्या शिखरावर पोहचलेली आहे. यश मिळविण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. ते कष्ट मी केलेले आहेत. तरुणांनी सुध्दा तसेच कष्ट करून मेहनत घेतली, तर यश नक्कीच मिळते. मला क्लासिकल सिंगिंग व लाइट म्युझिकमध्ये करिअर करायचे आहे, अशी प्रतिक्रिया सारेगमप लिटल चॅम्प्स 2017 ची विजेती अंजली गायकवाड हिने दिली आहे.

कष्टाचेच फळ अंजलीला मिळाले : गायकवाड

मी तिच्याकडे एक शिष्य म्हणून पाहिले. मुलगी म्हणून तिला काहीही शिकविले नाही. तिच्याकडून रोज रियाज करून घेतला. तिनेही त्यासाठी कष्ट घेतले. त्यामुळेच तिला या स्पर्धेत यश मिळाले आहे. तिच्या प्रमाणेच आणखी इतर शिष्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा आहे. अंजलीला मिळालेल्या यशाने मलाही प्रेरणा मिळाली असून आगामी स्पर्धांमध्ये अंजलीबरोबरच इतर शिष्यांना यश मिळविण्यासाठी आता मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया अंगद गायकवाड यांनी दिली.

मुलगी वंशाची ज्योती

मुलगा व मुलगी असा भेदभाव कधीच केला नाही. दोन्ही मुली असल्या तरी आम्ही त्यांचा मुलांप्रमाणेच संभाळ केला. मुलाप्रमाणेच त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. मुलगा जसा वंशाचा कुलदीपक आहे, तसेच मुली वंशाच्या ज्योती आहेत. कोणीच मुलगा व मुलगी भेदभाव करू नये. मुलगा जसे नाव कमावतो, तसेच मुलीही घराचे नाव उज्जवल करतात, अशी प्रतिक्रिया अंजलीच्या आईने दिली.

सर्वांचे आभार मानावेत तेवढे कमीच

सारेगामाप लिटल चॅम्प्स या स्पर्धेत सहभाग घेतल्यापासून आजपर्यंत मला देशभरातील जनतेने खूप मोठा प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला. त्यामुळेच मला या स्पर्धेत यश मिळविता आले आहे. त्यामुळेच मी आज या स्पर्धेची विजेती ठरलेली आहे. या स्पर्धेतील यशात अहमदनगर जिल्ह्यासह देशभरातील जनतेचा सहभाग आहे, अशी प्रतिक्रिया अंजली गायकवाड हिने दिली.

नंदीनीने विजयी व्हायला हवं होत

या स्पर्धेत मला यश मिळविल्याचा आनंद माझ्याबरोबरच माझ्या आई-वडिलांना व बहिणीलाही खूप झालेला आहे. परंतु या स्पर्धेत माझ्याबरोबर तिलाही यश मिळायला हवं होतं. परंतु तिला यश मिळाले नाही. त्यामुळे आनंदाच्या क्षणांमध्ये मनाला तिचे अपयश चटका लावून जात आहे. या स्पर्धेत ती कमी पडली आहे. तिला आणखी तयारी करावी लागणार आहे. तिला या अपयशातून खूप शिकायला मिळाले आहे. ती नक्कीच आगामी स्पर्धांमध्ये यशस्वी होईल, अशी अपेक्षा अंजलीने यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*