Type to search

Featured सार्वमत

श्रीरामपूर ग्रामीण रुणालयाला रस्त्याची साडेसाती!

Share

रस्त्याअभावी रुग्णांची हेळसांड; नियोजन मंडळाच्या निधीमुळे आशेचा किरण

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णालय स्थापनेपासून महाराणा प्रताप सोसायटी व आरटीओ यांच्या हद्दीतून रुग्णालय रस्त्याचा वापर करत आहे. मात्र आता या रस्त्यावरही शिरसगाव ग्रामपंचायतीने मोठमोठे दगड आणून टाकल्यामुळे आहे तो रस्ताही बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असताना नियोजन मंडळाकडून मंजूर निधीमुळे रस्त्याची साडेसाती सुटण्याचा आशेचा किरण दिसत आहे.

सर्वसामान्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात अव्वल तसेच कायाकल्प योजनेअंतर्गत राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा दोनवेळेस पुरस्कार मिळवून श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाने राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंतराव के. जमधडे व त्यांचे सहकारी या रुग्णालयाच्या माध्यमातून आवश्यक त्या सुविधा नागरिकांना पुरविण्यात येतात. मात्र रुग्णालय स्थापनेपासून या रुग्णालयाचा रस्त्याचा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्यामुळे रुग्णवाहिका तसेच इतर साधने आणण्यात अडचणी येत आहेत. अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी नगर येथील रुग्णालयात जावे लागत होते. मात्र श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात अपंगांसाठी उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अपंगांची याठिकाणी सतत ये-जा सुरू असते. त्यांनाही रस्त्याअभावी अडचणींना सामोरे जावे लागते.

रुग्णालयाने आरटीओ व महाराणा प्रताप सोसायटीच्या हद्दीतील रस्ता वापरून आजपर्यंत कामकाज सुरू ठेवले आहे. रुग्णालयात येण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी मंत्रालयापर्यंत डॉ. जमधडे यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. आमदार, खासदार यांच्यासमोरही रस्त्याची कैफियत मांडली, मात्र त्यास अद्यापर्यंत यश आले नाही. आता आरटीओ कार्यालयाने संरक्षक भिंतीचे बांधकाम करताना सामाजिक बांधिलकी जपत चारचाकी साधन जाईल एवढी जागा सोडली आहे. मात्र या जागेवर शिरसगाव ग्रामपंचायतीने मोठमोठे दगड आणून टाकल्याने हा रस्ता बंद झाला आहे.

सद्यस्थितीला याठिकाणी चारचाकी तर काय परंतु दुचाकी साधन जाणेही मुश्किल अशीच काही परिस्थिती आहे.
या रुग्णालयातून मोफत आरोग्य सुविधा मिळत असल्याने रुग्णांचा कल वाढता आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्रियांची प्रसृती यासह विविध तपासण्या, शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे रुग्ण संख्या मोठी असते. मात्र येणार्‍या रुग्णांना रस्त्याअभावी अडचणी येतात. तसेच तातडीच्या रुग्ण ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका येण्यास अडचण येते आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या रस्ता प्रश्‍नी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतरही हा प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने खा. सदाशिव लोखंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत नियोजन मंडळातून 17 लाख रुपये मंजूर केले आहे. रुग्णालयापासून राज्य मार्ग क्र. 51 ला जोडणार्‍या रस्त्याचे काम लवकरच सुरू होऊन रुग्णालयाच्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!