शेवगाव-पाथर्डी टँकरमुक्तीच्या दिशेने : पंकजा मुंडे

0
ढोरजळगाव (ता. शेवगाव) येथील जाहीर सभेत बोलताना राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व व्यासपीठावर अन्य मान्यवर. (छायाचित्र : भागवत बागडे)
शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातील जनतेला प्रथमच जलसंधारण खात्याची ओळख झाली. या योजनेअंतर्गत शेवगाव व पाथर्डी तालुक्यात 149 बंधारे उभारल्याने हा मतदारसंघ व राज्य टँकरमुक्तीच्या वाटेने प्रगती करत आहे.
नगर जिल्ह्यात 6361 किमी लांबीच्या रस्त्यांसाठी 750 कोटींचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. मी विकास करायला सुरुवात केली आहे. विकासाचा लाडू तुमच्या पर्यंत नक्कीच येईल, तुम्ही संयम ठेवा. 70 वर्षांची घाण काढायला 5 वर्ष पुरेशी नाहीत असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
ढोरजळगाव-ने ता. शेवगाव येथील त्रिमूर्ती शिक्षण संकुलाच्या प्रांगणात आज झालेल्या जाहीर सभेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे होत्या. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार दिलीप गांधी,
उद्योजक अमित पालवे, आ. बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, बीड जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हा परिषद सदस्या अनिता मुंडे-कराड उपस्थित होते. मुंडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ढोरजळगाव-शे ते वडुले, ढोरजळगाव-ने ते बडे वस्ती या सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
ना. मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यात सर्वाधिक निधी आपण शेवगाव-पाथर्डी मतदारसंघासाठी आ. मोनिका राजळे यांच्यामुळे उपलब्ध करून दिलेला आहे. 70 हजार कोटी रुपये खाऊनही पोट न भरलेले संघर्ष यात्रा काढत आहेत. त्यांना हा संघर्ष व नावही शोभत नाही.
आ. मोनिका राजळे म्हणाल्या चार वर्षांत या दोन्ही तालुक्यांत बंधारे, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालये यासह अनेक विकास कामे व प्रलंबित प्रश्न प्रामाणिक सोडविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी खासदार गांधी, दिनेश लव्हाट, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, आमदार मुरकुटे, दिनकर पालवे यांचीही भाषणे झाली.
सभेसाठी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, तुषार वैद्य, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उमेश भालसिंग, उदय शिंदे, बाळासाहेब आव्हाड, निंबे नांदूरच्या सरपंच रंजनाताई बुधवंत, अरुण मुंडे, गणेश कराड, रवि सुरवसे, कचरू चोथे, दिगंबर काथवटे, वाय.डी. कोल्हे, अनिल म्हस्के आदी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर यांनी केले. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. अनंता उकिर्डे यांनी आभार मानले.
या सभेत भाषण करताना मुरकुटे यांनी सभेसाठी उपस्थित असलेले त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे प्रमुख साहेबराव घाडगे यांना भाजपमध्ये प्रवेशासाठी गळ घातली. आजचा द्वादशी सारखा मुहूर्त पुन्हा येणार नाही. घाडगे यांचा फायदा मतदारसंघाच्या मजबुतीसाठी होईल असा त्यांचा आडाखा होता; मात्र घाडगे यांनी त्यांना दाद दिली नाही.

या सभेसाठी झालेल्या मोठ्या गर्दीचा फायदा घेत खिसेकापूंनी अनेकांच्या खिशाची बेमालूमपणे सफाई केली. एका पत्रकाराचा तर कॅमेरा व रोख रकमेवर डल्ला मारला.

 

LEAVE A REPLY

*