संघर्ष यात्रेस प्रतिसाद मिळणार नाही : ना. पंकजा मुंडे यांचा दावा

0

शिर्डी (प्रतिनिधी)- गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेला राज्यातील जनतेने मोठा प्रतिसाद दिला. काँग्रेसवाल्यांनी कितीही संघर्ष यात्रा काढल्या तरी लोक त्यांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद देणार नाहीत.संघर्ष हा शब्द काँग्रेससाठी शोभा देत नाही, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या संघर्षयात्रेची खिल्ली उडवली.

ना. पंकजा मुंडे यांनी काल शुक्रवारी शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, स्व. गोपीनाथ मुंडे आणि आपण काढलेल्या संघर्ष यात्रेला जनतेने मोठा प्रतिसाद दिला होता. जो खरंच जनतेसाठी संघर्ष करतो त्यांना जनता डोक्यावर घेते.

मात्र आमच्या संघर्ष यात्रेचे नाव वापरून काँग्रेसने सरकार विरोधात काढलेल्या संघर्ष यात्रेला लोकांनी नाकारले आहे. राम कदम यांच्या बोलण्याचा हेतू काहीही असला तरी त्यातून मेसेज चुकीचा गेला आहे, असे सांगत त्यांनी या प्रश्नावर अधिक बोलणे टाळले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, चंद्रकांत पाटील आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांना आम्ही घरी बसू देणार नाही.

2019 च्या निवडणुकीची तयारी आम्ही चार वर्षांपासूनच केली आहे. जनता भाजपावर नाराज नाही, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिध्द झाले आहे. आम्ही बेघर मुक्त महाराष्ट्रच्या केलेल्या घोषणेचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. त्याचा एक भाग म्हणून 2011 पर्यंतची अवैध घरे

नियमित करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने लाखो लोकांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जलमय केला. आता राज्यालाही विकासमय करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

साई संस्थानच्यावतीने कार्यकारी अधिकारी रूबल गुप्ता यांनी पंकजा मुंडे यांचा सत्कार केला.
यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, राजेंद्र पिपाडा यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दसरा मेळावा सावरगावीच…
यंदाचा दसरा मेळावा भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगाव येथेच होणार असल्याचेही मुंडे यांनी ठामपणे सांगितले.

आंदोलनांचा भाजपावर परिणाम होणार नाही –
मराठा व धनगर समाजाला आरक्षण कायद्याने देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. वरवर घोषणा करून आरक्षण कोर्टात टिकणार नाही. आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍यांबरोबर सरकार आहे. आंदोलनाचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही, असे ना. पकंजा मुंडे म्हणाल्या.

ढाकणेंच्या टीकेला जनतेनेच उत्तर दिले..
प्रताप ढाकणे यांनी आपल्यावर केलेल्या टिकेबद्दल मला माहीत नाही. मात्र जनतेने ढाकणे यांच्या टीकेला उत्तर दिले असल्याने आपण त्यावर अधिक बोलणार नाही, असे पंकजा यांनी सांगितलेे.

LEAVE A REPLY

*