Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

लवकरच बड्या देवस्थान, महामंडळांबाबत निर्णय – ग्रामविकास मंत्री

Share

महाआघाडीत मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील शिर्डी, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि मुंबईतील सिध्दीविनायक मंदिरासोबत राज्यातील महामंडळांच्या वाटपाबाबत महाविकास आघाडी सरकारचा निर्णय झालेला नाही. हे वाटप निश्‍चित झाल्यावर त्याठिकाणी पक्षाच्या प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात येईल. त्याचसोबत राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणुका लढविल्या आहेत. यामुळे त्याठिकाणी महाविकास आघाडीत घटक पक्षांना एकमेकांना संभाळून घ्यावे लागणार आहे. महाविकास आघाडीत मतभेद होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार असल्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीभवनमध्ये आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीत मंत्री ना. मुश्रीफ बोलत होते. यावेळी राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, आ. संग्राम जगताप, जिल्हा परिषद सभापती उमेश परहर, माजी आ. नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, दादा कळमकर, जिल्हाधक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, प्रताप ढाकणे, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, किसन लोटके, निर्मला मालपाणी, शारदा लगड, अशोक भांगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, आज सकाळी पारनेर येथे आ. निलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो होतो. त्याठिकाणी सेनेचे औटी यांना पराभूत करून लंके विजयी झालेले आहेत. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने सेनेच्या नेत्यांना देखील संभाळून घ्यावे लागणार आहे. महाविकास आघाडीत मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

राज्यातील शिर्डी, पंढरपूर आणि सिध्दीविनायक देवस्थान आणि महामंडळ वाटपचा निर्णय झालेला नाही. हा निर्णय झाल्यावर पक्षातील निष्ठावानांना त्याठिकाणी संधी देण्यात येईल. मात्र, तीन पक्षाचे सरकार असल्याने कार्यकर्त्यांना न्याय देताना मर्यादा येणार असल्याचे त्यांनी यावेळी आधोरेखीत केले. राष्ट्रवादीचे पवार यांचे नेतृत्व ही मोठी देणगीच असून ते कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे नेतृत्व आहे. राज्यातील भाजप सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले असून सामान्यांना स्वस्तात देण्यात येणार्‍या धान्यासोबत रॉकेल बंद करून माघडा गॅस घेण्यास त्यांना बाध्य केले आहे. यासह संजय गांधी योजनेत बदल करून पेन्शनची रक्कम दुप्पट करावी लागणार आहे. महात्मा फुले जीवनदायीनी योजनेतही बदल करून केंद्राच्या योजनेशी सांगड घालावी लागणार आहे. जनतेच्या लहानलहान गरजांकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

राज्यमंत्री तनपुरे यांनी जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासोबत पक्ष वाढीसाठी जे जे शक्य आहे ते प्रयत्न करण्यात येणार असून पालकमंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांची संख्या सहावरून दहा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष फाळके यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन युवकचे पवार आणि कोळगे यांनी केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!