आदिवासी पाडयांना एसटीने सोडले वारयावर; बसेसच नसल्याने गावकरयांचा धोक्याचा प्रवास

0

प्रवीण खरे | प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद असणारया एसटीने मागील अनेक वर्षांपासून आदिवासी पाडयांना वारयावर सोडले आहे. दिवसाला केवळ एकच बस सोडून नागरिकांची कोंडी केल्याने त्यांना खासगी वाहनांचा आधार घेत जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतोय.

29 जून ला प्रादेशिक परिवहन विभागाने एसटीच्या विभाग नियंत्रकांना आदिवासी भागात मिडीबस सेवा सुरू करण्याबाबत पत्र पाठविले आहे परंतु त्यावर एसटीने कोणतीही कारवाई करणे तर सोडा या पत्राला साधे उत्तरही दिलेले नाही.

या पत्रात म्हटले आहे की, ग्रामीण भागात प्रवासी असतांना देखील तेथे एसटी पोहोचलेली नाही. परिणामी नागरिकांना धोक्याचा प्रवास करावा लागून अपघात अन मृत्यूंमध्ये वाढ होवू शकते. तसेच नागरिकांना विमा भरपाई मिळण्यातही अडचण येवू शकते.

त्यामुळे मा. न्या राधाकृष्णन समितीने दिलेल्या निर्देशानुसार अपघाती मृत्यू रोखण्याकरीता अदीवासी भागात एसटीची मिडीबस सेवा द्यावी. त्यानुसार नाशिक जिल्हयातील पेठ-सुरगाणा, पेठ-हरसुल, हरसुल त्रयंबकेश्वर, त्रयंबकेश्वर घोटी, करंजाळी-हरसुल, कळवण-देवळा, कळवण बोरगांव, सटाणा तहाराबाद, कळवण-सटाणा, देवळा-सटाणा, बोरगांव-दिंडोरी मार्गावर 25 ते 30 आसनी मिडीबस सुरू करावी.

सदरची बस सकाळी 8 ते 6 या वेळेत प्रत्येक 10 ते 15 मिनीटांच्या अंतरावर असावी. काहीवेळेला बसला प्रवासी मिळणार नाही परंतु सामाजिक जबाबदारी पाडणे हे शासकीय व निमशासकीय सेवांना आवश्यक आहे. एसटी महामंडळ ज्येष्ठ नागरिकांना सवलत, शालेय विद्यार्थ्यांना सवलत देत आहे.

परंतु अशी सवलतीची भरपाई म्हणून राज्य शासनाने कोटयवधी रूपयांची मदत दिलेली आहे. तरी अवैध प्रवासी वाहतूक होवून होणारे अपघात व वाढते मृत्यू रोखण्यासाठी बससेवा सुरू करावी. परंतु अद्यापही या पत्राचा महामंडळाने गांभीर्याने विचार केलेला नाही. केवळ नफयाचा विचार करत एसटी आपले सामाजिक भान विसरत चालली आहे.

त्यामुळे दिवसेंदिवस आदिवासी पाडयावर अवैध प्रवासी वाहतूक वाढून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. हे मागील तीन वर्षांतील आकडेवारीवरून सिध्द होते. सध्या एसटी केवळ नफयाच्या मार्गावर प्रवासी सेवा देत आहे. नाशिक जिल्हयातील आदिवासी भागाचे तर दूर शहरातही एसटीने 100 बसेस बंद करून शहरवासीयांची देखील कोंडी केलेली आहे. त्यामुळे‘ प्रवाशांच्या सेवेसाठी ’ की ‘प्रवाशांच्या अडचणीसाठी’ असा सवालही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*