Type to search

Featured सार्वमत

ग्रामीण भागातील बेघरांना मिळणार घर

Share

स्थायी समिती : देहरे बंधाराप्रकरणी पुन्हा चौकशी समिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ग्रामीण भागात ब यादीत पात्र असणार्‍या मात्र यादीत नावे नसणार्‍या लाभार्थ्यांनाही घरकुलाचा लाभ मिळणार आहे. यासाठी सर्व लाभार्थींना, ग्रामपंचायतींना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात 12 हजार 825 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मिळणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा झाली. यावेळी या विषयाची माहिती देण्यात आली. यात अकोले 185, संगमनेर 379, कोपरगाव 465, राहाता 600, राहुरी 450, श्रीरामपूर 490, नेवासा 2 हजार 113, शेवगाव 1 हजार 799, पाथर्डी 714, कर्जत 1 हजार 335, जामखेड 725, पारनेर 495, श्रीगोंदा 1 हजार 945 आणि नगर 1 हजार 100 यांचा समावेश आहे. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना या योजनेतून घरकुल लाभ देण्यात येणार आहे. रमाई आवास योजनेतून यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

14 नोव्हेंबरपासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य आणि शिक्षण विभाग एकत्रित काम करणार असून महिला बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडी बालकांनाही ही लस देण्यात येणार आहे. योजना यशस्वी करण्यासाठी संबंधितांना जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अनुकंपा भरतीसाठी येत्या 7 तारखेला सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील जिल्हा शिक्षक पुरस्करांचे बुधवारी तर आदर्श शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कारांचे 10 तारखेला वितरण होणार आहे.

नगर तालुक्यातील देहरे गावात देवनदीवर बंधारा न बांधता त्याचे बिल काढून घेण्यात आले आहे. याप्रकरणी सदस्य प्रताप शेळके यांनी आवाज उठवत चौकशीची मागणी केली होती. सुरूवातीला कनिष्ठ अधिकार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी केलेली आहे. यामुळे आता वर्ग एकच्या अधिकार्‍यांमार्फत या प्रकरणाची नव्याने चौकशीचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. स्थायी समितीच्या सभेला सभापती अजय फटांगरे, सभापती उमेश परहर, सभापती अनुराधाताई नागवडे, सदस्य संदेश कार्ले, प्रताप शेळके, माधवराव लामखडे, सुप्रिया पाटील, अनिता हराळ, महेश सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगनाथ भोर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आणि अधिकारी उपस्थित होते.

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे जिल्हा परिषदेच्या जागेवर खासगी व्यक्तीने अतिक्रमण केलेले आहे. अनेक दिवसांपासून हा विषय जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये गाजत आहे. यामुळे काल अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना फोन करून येत्या 6 तारखेला अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यानुसार पोलिसांच्या उपस्थितीत बेलवंडीतील हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. यासह जिल्ह्यातील जि.प.च्या जागांवरील अतिक्रमणे काढून त्या जागा विकसीत करण्यात येणार आहेत.

राज्य विद्युत महामंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, अंगणवाडी आणि शाळांना कमी दराने वीजपुरवठा होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याबाबत सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!