रविवारी ‘रन फॉर हेल्दी हार्ट’; मराठी अभिनेता सुयोग गोरे यांची प्रमुख उपस्थिती

0

नाशिक । नियमित व्यायाम केल्याने उत्तम आरोग्य लाभते. अलीकडे वेगवेगळ्या माध्यमातून आरोग्य जपण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. पर्यटनस्थळांना पावसाळ्यात अनेक पर्यटक भेटी देतात.

या मोसमाचे औचित्य साधून नाशिकच्या मॅरेथॉनर्स क्लब आणि ‘देशदूत’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.13) ‘रन फॉर हेल्दी हार्ट’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात राज्यात डांग जिल्ह्यातील सापुतारा ते महाराष्ट्रातील कळवण तालुक्यात असणार्‍या धनुली गावादरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुजरातमध्ये येत्या शनिवार (दि.12) पासून मान्सून महोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी असते. त्यामुळे येथील पर्यटकांना वेगळी सकाळ या दिवशी बघावयास मिळणार आहे.

ही मॅरेथॉन तीन टप्प्यात घेण्यात येईल. यामध्ये साधारणपणे 3 कि.मी., 5 कि.मी. आणि 10 कि.मी.चा समावेश आहे. स्पर्धकांना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सापुतारा येथील लेक गार्डनजवळ हजेरी लावायची आहे. त्यानंतर सकाळी 6 वाजता पहिल्या टप्प्यातील स्पर्धक सापुतार्‍याहून धनुलीकडे कूच करतील.

5 कि.मी.चा दुसरा टप्पा लगेचच पंधरा मिनिटांनी सुरू होईल. त्यानंतर स्पर्धेचा शेवटचा 3 कि.मी.चा टप्पा साडेसहा वाजता पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी अनेक दिवसांपासून तयारी पूर्ण करण्यात येत असून शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धेतील विजेच्या स्पर्धकांना मेडल, बक्षीस स्वरुपात रोख रक्कम दिली जाणार आहे.

स्पर्धेचे तीनही टप्पे पूर्ण झाल्यानंतर बक्षीस वितरण आणि समारोप होईल. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते सुयोग गोरे, ‘देशदूत’चे संचालक संपादक विश्वास देवकर, गुजरात टूरिझम विभागाचे महाव्यवस्थापक आर.जे. भोसले, डांग ग्रामीणचे सापुतारा येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. धाकडा, कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल फुला आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या स्पर्धेसाठी मॅरेथॉनर्स क्लब, ‘देशदूत’, ग्रेप कौंटी, गुजरात पर्यटन विभाग, ईशा पब्लिसिटी, बनकर सिक्युरिटी आणि फे्रंडस् समूहाचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7719900067 व 8888863672 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*