अहमदनगर(कर्मयोगिनी) | रुबल अग्रवाल : गतिमान प्रशासनात साईभक्त केंद्रस्थानी

0

मुख्य कार्यकारी अधिकारी
साईसंस्थान शिर्डी
-राज्यात विविध ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडली., गट : प्रशासन

राजस्थानातील देवळी या खेड्यात रूबल अग्रवाल यांचा जन्म झाला. राजस्थान पब्लिक सर्विसेसची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आयएएस होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी थेट देवळीवरून दिल्लीला जाऊन दोन वर्षे खडतर परिश्रम करून आयएएसचे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केले. आयएएसचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र केडर मिळाले. अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर जळगावला जिल्हाधिकारी म्हणून व आता साईसंस्थानवर मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळाली.

साईसंस्थानच्या पहिल्या महिला आएएस अधिकारी रुबल अग्रवाल सांगतात, राजस्थानमधील देवळी या छोट्याशा खेड्यात माझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण याच गावातील मिशनरी स्कूल मध्ये झाले. पदवीपर्यंतचे शिक्षणही तेथेच घेतले. या काळातच मी राज्यस्थान पब्लिक सर्विसेसच्या परीक्षेची तयारी सुरू केली. मला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. मात्र या यशामुळे माझ्यात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला.

या आत्मविश्वाच्याच्या जोरावर आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे मनोमन ठरवले. आईवडिलांची भक्कम साथ मिळाल्याने नक्कीच आयएएस होऊ असा विश्वास वाटू लागला. त्यानंतर देवळी वरून मी थेट दिल्लीला गेले. हा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस ठरला. लागलीच परीक्षा न देता दोन वर्षे जिवापाड मेहनत करून 2008 साली आयएएसची परीक्षा उत्तीर्ण केली. मसुरीला ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर मला महाराष्ट्र केडर मिळाले. माझ्या दृष्टीने हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस होता.

महाराष्ट्र केडर मिळाल्यावर काम करण्यास मोठी संधी असते अशी चर्चा मसुरी येथील ट्रेनिंगच्या काळात ऐकले होते. पहिली पोस्टिंग विदर्भातील अकोला येथे डेप्युटी कलेक्टर या पदावर झाली. काही काळानंतर मला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे प्रांताधिकारी या पदावर स्वतंत्र काम करण्याची संधी मिळाली. येथे सरकारच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. चांगले प्रशासन दिले. या कामाची दखल घेऊन सरकारने 2011 साली मला नगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्याकारी अधिकारी या पदावर काम करण्याची संधी दिली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन प्रश्न समजावून घेतले. योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन गतिमान केले. 2000 सालापासून जिल्हा परिषदेची स्थानिक संस्थांकडे असलेली थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान होते. सर्व यंत्रणा कामाला लावल्या आणी 10 वर्षातील जिल्हा परिषदेला हवी असलेली 28 कोटीची थकबाकी जमा करून दाखवली. पुढे हाच पैसा ग्रामपंचायतींना विकासासाठी देण्यात आला.

त्यानंतर जळगाव येथे जिल्हाधिकारी या पदावर बदली झाल्यावर ‘तेथे बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानाबरोबरच जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामाला चालना दिली. निवृत्त झालेल्या लोकांचा मोठा प्रश्न हेता. एजंट लोकांकडून पेन्शनरांची फसवणूक होत असल्याचे आपल्या निदर्शनास येताच तलाठ्यापासून तहसीलदारांना कामाला लावले. निवृत्त झालेल्या लोकांसाठी समाधान योजनेची प्रभावी अमलबजावनी करून एका महिन्यात हजाराच्यावर पेन्शनरांना सर्व प्रकारच्या सेवा गावातच उपलब्ध करून दिल्या.

या कामाची दखल घेत राज्य सरकारकडून उकृष्ट जिल्हाधिकारी अवॉर्डही मिळाला. जळगावला जिल्हाधिकारी असताना बदलीचा आदेश आला. साई संस्थानवर मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करण्याची संधी मिळाली. साईंच्या सहवासात काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी आनंदाने साईंच्या चरणी लीन झाले. साई संस्थानचा कार्यभार स्वीकारून पहिल्याच दिवसापासून साईभक्तांसाठी सेवेचे काम सुरू केले. साईबाबा समाधी शताब्दी वर्षात साईभक्तांसाठी खूप काही करता येणे शक्य असल्याने शिर्डी व परिसरासाठी साडेतीन हजार केटींचा विकास आराखडा तयार करून सरकारकडे पाठवला.

सरकारनेही या आराखड्यास मान्यता दिली. साईभक्त हेच शिर्डीचे दैवत आहेत. त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच साईसृष्टी प्रकल्प, निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, सोलर पॉवर, भक्तनिवास नूतनीकरण, साई वॅक्स म्युझियम, साई प्लॅनेटेरियम, सायन्स पार्क, शहरातील रस्ते रुंदीकरण व सुशोभिकरण ही कामे प्राधान्याने करावयाची आहे. विश्वस्त मंडळाच्या निर्णयांची अमलबजावणी करतानाच चुकीचे निर्णयही त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम करणार आहे.

LEAVE A REPLY

*