Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आरटीई प्रवेशासाठी फेब्रुवारीत प्रक्रिया; यंदा एकाच टप्प्यात लॉटरी; प्रतीक्षा यादीही जाहीर होणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी यंदा फेब्रुवारीत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रवेशासाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार असून प्रतीक्षा यादीदेखील तयार करण्यात येणार आहे. आरटीई प्रवेशासाठी यंदा काही नवीन नियमांचीही अंमलबजावणी करावी लागणार आहे.

आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी संपूर्ण राज्यात ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येते. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया राबवण्यास मान्यता मिळवण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पत्र पाठवण्यात आले होते.

त्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. प्रवेशाबाबत शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय सूचना केंद्रातील (एनआयसी) अधिकार्‍यांबरोबर बैठक होणार आहे. यात प्रवेशाचे वेळापत्रक, पूर्वतयारी, तांत्रिक अडचणींवर उपाययोजना यावर चर्चा करण्यात येईल.

दरवर्षी प्रवेशासाठी तीन टप्प्यात लॉटरी काढण्यात येत होती. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया शाळा सुरू झाल्यानंतरही चालूच राहत होती. मागील वर्षात प्रवेशासाठी चार फेर्‍या घेण्यात आल्या होत्या. मात्र प्रवेशासाठी पालकांना सोयीच्या शाळा न मिळाल्यामुळे बहुसंख्य शाळांमधील जागा रिक्तच राहिल्या होत्या. आता प्रवेशासाठी एकादाच लॉटरी काढण्यात येणार आहे. उपलब्ध जागांसाठी लॉटरी काढून त्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ठराविक कालावधीसाठी मुदत दिली जाणार आहे.

जेवढ्या उपलब्ध जागा आहेत तेवढ्या जागांसाठी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार असून लॉटरीतील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ याप्रमाणे प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येईल. मेअखेरपर्यंत सर्व प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज

पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करून ठेवावी. त्यामुळे नंतर धावपळ होणार नाही. प्रवेशासाठी आधी शासन मान्यताप्राप्त शाळांची व उपलब्ध जागांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांना प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!