पराभवाचं काढायचंय उट्टं, त्यासाठी झालोय फिट्टं! 2019 साठी आठवलेंची शिर्डीत पायाभरणी

0

रिपाइं वर्धापन दिन सोहळ्यात शक्तीप्रदर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी)- कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी शिर्डी लोकसभा मतदार संघातील पराभव आठवलेंना आठवल्याशिवाय राहतच नाही. जिव्हारी लागलेल्या या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मीच फिट्टं असल्याचे दाखविण्यासाठी आठवले आज शिर्डीत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, मंत्री चंद्रकांत पाटील, महादेव जानकर, प्रा. राम शिंदे हे शक्तीप्रदर्शनाचे प्रत्यक्षदर्शी ठरावे यासाठी त्यांनाही मेळाव्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्ताने शिर्डीत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठीच आठवलेंनी महामेळाव्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवड केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा शिर्डी मतदारसंघातून पराभव केला होता. वाकचौरे यांना 3 लाख 59 हजार 921 मते मिळाली होती तर रामदास आठवले यांना 2 लाख 27 हजार 170 मते मिळाली होती. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्याच सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसमध्ये गेलेल्या भाऊसाहेब वाकचौरेंचा पराभव केला. लोखंडे यांना 5 लाख 32 हजार 936 तर वाघचौरे यांना 3 लाख 33 हजा 014 मते मिळाली होती.
लोकशाही आघाडीतील जिल्ह्यातील नेत्यांनी जाणूनबुजून शिर्डीतून पराभव केल्याची जाहीर टीका आठवले यांनी नेहमीच केली. त्याचे शल्य बोचत असल्याने त्यांनी लोकशाही आघाडीला बायबाय करत भाजपची साथ धरली. त्यामुळे 2014 मध्ये ते राज्यसभेवर गेले व केंद्रीय मंत्री झाले.

मात्र शिर्डीतील पराभवाची सल आजही आठवलेंच्या आठवणीत कायम असून त्यांना या पराभवाचे उट्टे काढायचे आहे. त्यासाठी आगामी लोकसभा शिर्डीतून लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शिर्डीत पक्षाचा वर्धापनदिन साजरा करून निवडणूक तयारीची पायाभरणी केली जात आहे. आठवले यांनी शिर्डीतूनच निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही आठवले यांना शिर्डीतून पराभूत केल्याचा राग आहे. त्यामुळे राज्यातून किमान एक लाख कार्यकर्ते मेळाव्याला नेण्याचा निर्धार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने पक्षाच्या वतीने शक्तिप्रदर्शन करून आगामी निवडणुकीसाठी बेस तयार करण्यात येत असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने ‘नगर टाइम्स’शी बोलताना सांगितले.

त्यांचे फाटेल अन् आमचं घाटेल!
जागा वाटपात शिर्डीची जागा ही सेनेच्या कोट्यात आहे. मग आठवले यांना भाजपचे तिकिट मिळणार कसे? याकडे लक्ष वेधले असता ‘सद्यस्थिती पाहता सेना-भाजपचे फाटेल असे वातावरण आहे. त्यामुळे चिंता करायची नाही’ असे मार्मिक उत्तर या नेत्याने दिले. शिवाय पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, मंत्री चंद्रकांत पाटील, जानकर, शिंदे हे शक्तीप्रदर्शन पाहून आठवलेंसाठी पक्षाकडे शब्द टाकतील असा विश्‍वासही या नेत्याने व्यक्त केला.

मराठा क्रांती परिषद शिर्डीत घेण्याचे आठवले यांनी जाहीर केले होते, मात्र त्यावेळची परिस्थिती पाहता ही परिषद कोल्हापूरला घेण्यात आली. त्यावेळही असेच शक्तीप्रदर्शन केले जाणार होते, मात्र ती उणीव आजच्या मेळाव्यातून भरून काढली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*