रोटरी हा श्रीमंत मनाचा क्लब : आमदार बाळासाहेब थोरात

0

 अकोले येथे पदग्रहण समारंभ

अकोले (प्रतिनिधी) – रोटरी हा श्रीमंतांचा नव्हे तर श्रीमंत मनाच्या माणसांचा क्लब आहे. सरकारच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम रोटरीने करावे असे आवाहन राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
अकोले येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या रोटरी क्लबचा सनद प्रदान व पदग्रहण सोहळा अकोले महाविद्यालयातील के. बी. दादा सभागृहात संपन्न झाला. या शानदार सोहळ्याला तालुक्यातील मान्यवरांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आ.थोरात बोलत होते.
व्यासपिठावर आमदार वैभवराव पिचड, दैनिक सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, नगराध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ, माजी प्रांतपाल प्रमोद पारीख, पुणेचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा, अकोले रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल वैद्य, सचिव सचिन आवारी, संगमनेरचे अध्यक्ष भारतभूषण नावंदर, माजी अध्यक्ष व अकोलेचे क्लब अ‍ॅडव्हायजर सुनील कडलग उपस्थित होते.
आ.थोरात म्हणाले की, रोटरी हा गरिबांसाठी काम करणारा श्रीमंत माणसांचा क्लब असल्याचे म्हटले जाते मात्र तसे नसून हा श्रीमंत मनाच्या माणसांचा क्लब आहे. रोटरी क्लबमध्ये सहभाग घेणार्‍यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच झळाळी प्राप्त होत असते. संगमनेर रोटरी क्लबने नेत्र रुग्णांच्या बाबतीत केलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. अकोले रोटरी क्लबही असेच वैशिष्ट्यपूर्ण काम करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आ. वैभवराव पिचड यांनी पोलिओ निर्मूलनाच्या संदर्भात रोटरी क्लबने जागतिक स्तरावर केलेले काम उल्लेखनीय असल्याचे सांगितले.अकोले क्लबने पदग्रहण समारंभा पूर्वीच आपल्या कामास सुरुवातही केली आहे. कळसूबाईच्या शिखरा एवढी उंची गाठणारे काम या क्लबकडून व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
112 वर्षात रोटरीने बरेच बदल अनुभवले.धर्म, वंश, जात, रंग, प्रांत याला थारा न देता रोटरीचे कार्य सुरू आहे.आपल्या देशाने विविध बाबतीत प्रगती केली असली तरी आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत असमाधानाचे वातावरण जाणवते. समाजातील अस्वस्थता आणि समाजाला भेडसावणारे नैराश्य या विषयावर रोटरी क्लबने काम करावे असे आवाहन सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी केले.
मावळते प्रांतपाल प्रमोद पारीख यांनी रोटरी डिस्ट्रिक 3132 च्या कामाचा आढावा घेतला. नगरमध्ये लवकरच शेतकर्‍यांसाठी कृषी साधनांची बँक 50 लाख रुपये खर्च करून सुरू करण्यात येणार आहे. वर्षभरात 1500 शाळांमध्ये डिजिटल स्कूल सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.स्वखर्चाने तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेला ग्रंथालय देण्याची घोषणा त्यांनी केली.
नगराध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ म्हणाले, गरिबांच्या सेवेला प्राधान्य देणे आनंदाची बाब आहे. प्रमुख व्याख्याते मोहन पालेशा यांच्या ओघवत्या शैलीतील भाषणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले की, आज सामाजिक जाणिवा वाढल्या असल्या तरी व्यक्तिगत संवेदना मात्र बोथट झाल्या आहेत. वृध्दाश्रम पंचतारांकीत होत असताना वयोवृध्द आईवडील मात्र पोटच्या मुलांनी नाकारल्याने अगतिक बनत आहेत.
आनंद मिळविण्यात विवेकाचा अभाव आलेला आहे, मात्र अशाही स्थितीत हातांना देण्याची सवय लावण्याचे काम सर्वांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रोटरीचे पहिले अध्यक्ष अमोल वैद्य यांनी स्वागत करून वर्षभरात राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रास्तविक क्लब सल्लागार सुनील कडलग यांनी केले.
सूत्रसंचालन दीपक महाराज देशमुख यांनी केले. संगमनेर रोटरीचे अध्यक्ष भारतभूषण रावंदर यांनी कार्यक्रमाची कॉल टू ऑर्डर केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोटरीच्या अमृतरत्न या बुलेटीनचे प्रकाशन करण्यात आले व सर्व सदस्यांना नूतन अध्यक्षांच्या हस्ते रोटरी पीन प्रदान करण्यात आली.
रोटरीचे सचिव सचिन आवारी यांनी आभार मानले.सौ. शुभांगी बिबवे-डोंगरे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. क्लब सदस्य संदीप मालुंजकर यांच्यावतीने सर्व उपस्थितांना कडू लिंबाचे रोप भेट देण्यात आले.
कार्यक्रमास गिरजाजी जाधव, जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, मीनानाथ पांडे, सौ. संज्योत वैद्य, अजित काकडे, पवनकुमार वर्मा, परबतराव नाईकवाडी, आप्पासाहेब आवारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*