रोख-ठोक मुलाखत : ज्येष्ठ नगरसेवक किशोर डागवाले : सेना-राष्ट्रवादीला लवकरच खिंडार

0

सेना-राष्ट्रवादीला लवकरच खिंडार ;  अनेक नगरसेवक भाजपाच्या संपर्कात

अहमदनगर महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. ते पार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम त्यादृष्टीनेही सुरूही झाले आहे. महापालिकेतील सत्ता मिळताना होणार्‍या तडजोडीच्या राजकारणामुळे शहर विकासापासून लांब राहिले. महापालिकेतील सत्तापक्षाचे शहर, उपनगरातील नगरसेवक भाजपशी संधान बांधून असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ नगरसेवक किशोर डागवाले यांनी केला. माझा कोणी विरोधक नाही. जो पक्षाचा विरोधक तो माझा विरोधक. मी कोणत्याही पदाच्या शर्यतीत नाही. पक्ष कामाचे मुल्यमापन करून करून उमेदवार ठरवेल. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार वागणारा मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे, असे सांगत मी महापौर पदाच्या शर्यतीत नसल्याची प्रांजळ कबुली किशोर डागवाले यांनी दिली. ‘नगर टाइम्स’शी डागवाले यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारत आपली राजकीय दिशा स्पष्ट केली.

 • वारंवार पक्ष बदलण्याचे नेमके कारण काय?
  – मी 25 वर्षापासून नगरसेवक आहे. त्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय आहे. मी स्पर्धक होऊ नये यासाठी सातत्याने दाबण्याचा प्रयत्न सेना, मनसेतही झाला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याची वेळ आली तर सेनेच्या नेतृत्वाने मोठेपणा न दाखविता कोतेपणा (रोख अनिल राठोड यांच्याकडे होता) दाखविला. मनसेतही मी मोठा होणार नाही, यासाठी पक्षांतर्गत विरोधक प्रयत्न करत होते. प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागला. किती काळ संघर्ष करणार? या संघर्षाला कंटाळून मी पक्ष बदलले. मात्र जनतेशी प्रामाणिक राहिलो.
 • तुम्ही भाजपचा ओबीसी चेहरा असल्याची चर्चा आहे?
  – तसं काही नाही. कोणाला शह देण्यासाठी माझा भाजप प्रवेश नाही. अ‍ॅड. अभय आगरकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे. माझी आगरकरांसोबत तुलना होऊ शकत नाही.
 • महापालिकेतील अस्थिर राजकारणाला कारणीभूत कोण?
  – अर्थातच शहरातील प्रत्येक पक्षाचे नेतृत्वच त्याला कारणीभूत आहे. महापालिकेतील सत्ता स्थिर झाली तर महापौर राजकीयदृष्ट्या सक्षम होईल. तो सक्षम झाला की तो भविष्यात उमेदवारीसाठी स्पर्धक होईल, ही भिती प्रत्येक पक्षातील नेतृत्वाला राहिली आहे. त्यामुळे तेच महापालिकेतील अस्थिर राजकारणाला कारणीभूत आहेत.
 • शहर विकासापासून दूर राहण्याचे कारण काय?
  – महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी अनेक पक्षासोबत हातमिळवणी करावी लागते. त्यातून तडजोडीचे राजकारण होते. त्यामुळे शहरात विकास कामे करताना अडचणी येतात. सत्तेत सहभागी असलेले पक्ष मोठा कसा होईल हेच पाहत असतात. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होतो. त्यामुळे शहराचा विकास करायचा असल तर पक्ष कोणताही असू द्या, मात्र त्या पक्षाची महापालिकेत एकहाती सत्ता असली पाहिजे. भाजपचे केंद्रात, राज्यात सरकार आहे. शहरात भाजपचे दिलीप गांधी खासदार आहेत. त्या माध्यमातून शहर विकासासाठी निधी आणला जाईल.
 • तुमचा राजकीय विरोधक कोण?
  – माझा कोणीही वैयक्तिक राजकीय विरोधक नाही. जो भाजपचा विरोधक तो माझा विरोधक असेल.
 • गामी महापालिका निवडणुकीत तुमचे/पक्षाचे मिशन काय असेल?
  – अब की बार भाजप सरकार.. हा पक्षाचा अजेंडा असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत भाजपची सत्ता तीही एकहाती आली पाहिजे. त्यादृष्टीने व्यूहरचना केली जाईल. त्याची सुरूवातही झाली आहे. महापालिकेतील सत्ताधारी सेनेचे अनेक नगरसेवक भाजपशी संधान बांधून असून योग्यवेळी त्यांचा भाजप प्रवेश होईल. प्रत्येक प्रभागात 25 जणांची समन्वय समिती स्थापन केली जाईल. त्या माध्यमातून आगामी काळात भाजपचे सक्षम उमेदवार शोधले जातील.
 • एकहाती सत्ता आल्यास तुम्ही महापौर पदाचे दावेदार असताल का?
  – मी कोणत्याही पदाच्या शर्यतीत नाही. निवडणुकीसाठी अजून दीड वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. पक्ष माझ्या कामाचे मुल्यमापन करेल. पक्ष देईल तो महापौर पदाचा उमेदवार असेल. तो मलाही मान्य असेल. संधी आली तर तिचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. पण मी कोणत्याही पदाच्या शर्यातीत नाही. माझ्या राजकीय अनुभवाचा पक्षाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
 • उत्तरेतील आक्रमण कसे थोपविणार? गांधींवर साटेलोट्याचा आरोप का होतो?
  – सर्वाधिक कार्यकर्त्यांची फळी असणारा भाजप हा शहरातील एकमेव पक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांची वाणवा आहे. त्यामुळे उत्तरेतून कोणतेही राजकीय अतिक्रमण झाले तरी जनताच ते परतावून लावेल. खासदार दिलीप गांधी हे सरळपणे निवडणुका लढवितात. ते कोणाशीही छुपी युती करत नाहीत. तडजोडही करत नाहीत. सामान्यांच्या जीवावर ते निवडून येतात, असा आजवरचा माझा अनुभव आहे.

LEAVE A REPLY

*