Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

रोहकले गटाचा स्वतंत्र झेंड्याखाली कारभार

Share

गुरूमाऊली मंडळात फूट : सर्व संघटनांना सेवानिवृत्त चालतात, केवळ मी नको असल्याचा रोहकले यांचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक बँकेत पैसे कमावणे हा माझा हेतू कधीच नव्हता. त्यामुळे अध्यक्षपद सोडताना दु:ख वाटलेच नाही. मी सर्वसामान्य शिक्षकांच्या सुख-दु:खात कायम सहभागी होतो अन् कायम राहील. शिक्षक संघ सोडताना मनाला प्रचंड वेदना होत आहेत. पण मी बँकेत एक रुपया जरी खाल्ला असेल तर माझी नार्को चाचणी करा, असे आव्हान विरोधकांना देत शिक्षक नेते रावसाहेब रोहकले यांनी शिक्षक परिषदेचा नवा झेंडा हातात घेतला आहे. रोहकले यांच्या निर्णयामुळे शिक्षक बँकेत सत्तेत असणार्‍या गुरूमाऊली मंडळात पडलेल्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले.

शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळात रावसाहेब रोहकले व बापूसाहेब तांबे गटात गेल्या काही काळापासून सुरु असलेला संघर्षामुळे गुरूमाऊली मंडळाची दोन गटात विभागणी झाली आहे. रोहकले गट आता राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या संघटनेत काम करणार असून जिल्हा पातळीवर गुरुमाऊली मंडळ या नावानेच काम सुरु असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा मेळावा मंगळवारी रोहोकले गटाने नगर येथील ओम गार्डन येथे आयोजित केला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार भगवान साळुंके होते. यावेळी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे अध्यक्ष राजेश सुर्वे आदी उपस्थित होते. मेळाव्यास मोठ्या संख्याने शिक्षक उपस्थित असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. यावेळी विविध शिक्षक संघटनांतील कार्यकर्त्यांनी शिक्षक परिषदेत प्रवेश केला.

प्रास्तविक विकास डावखरे यांनी केले. यावेळी टेमकर,तांबे, संजय शेळके, बाळासाहेब बोडखे, पोपट नवले, राजाभाऊ पालवे आदींची भाषणे झाली. यावेळी रोहकले म्हणाले, सगळ्या शिक्षक संघटनांना सेवानिवृत्त शिक्षक नेते चालतात. केवळ माझ्या नावाची एलर्जी का आहे. मी कधीच कुणाचा व्यक्तीव्देष केला नाही. कुणाच्या बद्दल कधीच सोशल मीडियावर एक शब्दही लिहीत नाही व माझ्या समर्थकांना पण चुकीचे लिहू देत नाही. पण मी बँकेत भ्रष्टाचार करू देत नाही म्हणून सगळे जण जिल्हा समन्वयच्या नावाखाली एक झाले आहेत. यांचे सर्वांचे कारभार शिक्षक सभासदांनी बघितले आहेत. ज्यांच्या अंगाला दिवसभर दारुचा वास असतो ते माझ्यावर दारू पिण्याचा व धाब्यावर जेवत असल्याचा बालीश आरोप करत आहे.

नेते मेळाव्याला या असे निमंत्रण देत असतात इथे माझ्या मेळाव्याला लोकांनी येऊ नये म्हणून आवाहन केल जात होते हे दुर्देवी आहे. या ठिकाणची उपस्थिती बघून सर्वसामान्य शिक्षक माझ्या विचारांसोबत आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. मला शिक्षक पुढार्‍यांची आवश्यकता नाही. सर्वसामान्य प्रामाणिक शिक्षक ही माझी खरी ताकद आहे. संचालक होण्यासाठी दहा दहा लाख रूपये खर्च करण्याची पध्दत मी बंद केली. 900 तलाठी आठ कोटींचे संकुल उभारतात. आपण बारा हजार शिक्षक एक संकुल का उभारू शकत नाही असा सवाल करत त्यांनी विकास मंडळ इमारतीचे समर्थन केले.

कार्यकारिणी जाहीर
यावेळी राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात अध्यक्ष: प्रविण ठुबे, कार्याध्यक्ष: राम निकम, सरचिटणीस: दत्ता गमे, कोषाध्यक्ष तुषार तुपे, कार्यालयीन चिटणीस गणेश वाघ, कल्याण राऊत, प्रसिध्दीप्रमुख अंबादास गारूडकर, उत्तर जिल्हा प्रमुख बाबुराव कदम, दक्षिण जिल्हा प्रमुख बाळासाहेब मगर आणि सुभाष गरूड यांचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!