Tuesday, April 23, 2024
Homeनगररोहित्र दुरुस्तीसाठी शिवप्रहार संघटनेने महावितरण कामगारांना विचारला जाब

रोहित्र दुरुस्तीसाठी शिवप्रहार संघटनेने महावितरण कामगारांना विचारला जाब

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – शिर्डी शहरातील साकुरी शीव येथील रोहित्राचे सहा महिन्यापासून कटआउट आणि अन्य सामग्री खराब झाले असून या भागातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होतो. दरम्यान सदरील रोहित्राच्या वस्तू बदलण्यासाठी महावितरण कंपनीच्या कामगारांनी येथील शेतकर्‍यांना वर्गणी गोळा करून नवीन आणून द्या, असे सांगितले आहे. मात्र सदर कामकाज हे महावितरण कंपनीचे असून ते शेतकर्‍यांच्या माथी का मारता, असा सवाल शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी उपस्थित करून कर्मचार्‍यांना जाब विचारला आहे.

येथील शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून महावितरण कंपनी वीज बिल वेळोवेळी भरून घेतले जात असताना रोहित्राच्या दुरुस्तीसाठी वर्गणी गोळा करून कामकाज केले जात असल्याचे संबंधित महावितरणचे अभियंता नारायण सोनवणे व श्री. गिरी यांना जाब विचारला असता श्री. सोनवणे यांनी चौगुले यांना आपण याबाबत मला फोन करत जाऊ नका, असे सांगून जे काय असेल ते सेक्शन ऑफिसरला बोलत जा ते काम माझे नाही असे सांगितल्यावर चौगुले यांनी विज वितरण कंपनीचा पगार घेणार्‍या सोनवणे यांचे काम काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisement -

याप्रश्नी शिवप्रहार संघटनेने लक्ष घातल्याने महावितरणच्या कामगारांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. तातडीने रोहित्रावरील दुरुस्ती संदर्भातील कारवाई सुरू केली. महावितरणच्या या उद्यापनाच्या व मनमानी कारभाराच्या विरोधात शिवप्रहार संघटना आक्रमक आंदोलन करणार असून राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांची पिळवणूक न थांबविल्यास संबंधित अधिकार्‍यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा यावेळी शिवप्रहार संघटनेच्यावतीने देण्यात आला. यावेळी शिवप्रहार संघटनेचे मदन मोकाटे, सचिन गव्हाणे, आदिनाथ शिंदे, बाबासाहेब गवारे, किरण दंडवते तसेच शेतकरी सुभाष दंडवते, सुनील कोते, तुळशीराम दंडवते, कैलास कोते आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या