Type to search

Featured सार्वमत

बालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद

Share

आरोपी मातापूर, उक्कलगाव व केडगावचे

  • 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
  • वैजापूरच्या तिघांचा शोध सुरू

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील तेल आणि मैद्याचे व्यापारी मथुरा बालाणी यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एक जण येवला पोलिसांच्या ताब्यात असून एक फरार आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
वॉर्ड नं 7 मधील उत्सव मंगल कार्यालयासमोरील श्री. बालाणी यांच्या बंगल्यावर बुधवार दि. 15 मे 2019 रोजी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सोने, रोख रक्कम व अन्य वस्तू असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल तलवारीचा धाक दाखवून लुटून नेला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सागर गोरख मांजरे (रा. मातापूर, ता. श्रीरामपूर, हल्ली पाईपलाईनरोड, अहमदनगर) व आकाश संजय गायकवाड (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) यांनी हा गुन्हा केला असून ते उक्कलगाव येथे येणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, पो.ना. साईनाथ राशिनकर, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सायबर सेलचे पो.हे.कॉ. राजेंद्र गोडगे, मुकुंद कणसे, पो.कॉ. प्रमोद जाधव, फुरकान शेख, गोकुळदास पळसे,

आकाश बहिरट, उपविभागीय पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या पथकातील पो.कॉ. रवि मेढे, सुनील शिंदे यांच्या पथकाने उक्कलगाव येथे सापळा लावून वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचापूस केली असता त्यांनी सुरवातीला उडवा-उडावीची उत्तरे दिली. सायबर सेलने त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले असता ते खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी तोंड उघडले. हा गुन्हा आपण सुधीर कडूबाळ सरकाळे (रा. केडगाव, अहमदनगर), राजू गुंजाळ (रा. उंदीरवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) व करण (पूर्ण नाव समजले नाही, रा. वैजापूर, जिल्हा औरंगाबाद) यांच्या मदतीने केल्याची कबुली त्यांनी दिली. यातील आरोपी सागर मांजरे व सुधीर सरकाळे यांच्याविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात प्रत्येकी सात गुन्हे दाखल आहेत. तर आकाश गायकवाड विरूध्द कोपरगाव शहर व वावी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

यातील सागर मांजरे, आकाश गायकवाड व सुधीर सरकाळे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. तर चौथा आरोपी राजू गुंजाळ हा येवला पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अटक असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. कायदेशिर प्रक्रिया पार पूर्ण केल्यानंतर त्याला श्रीरामपूर शहर पोलिस ताब्यात घेणार आहेत. पोलिस कोठडीतील तीन आरापींची चौकशी केली असता त्यांनी 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकुण 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिला.
या गुन्ह्यातील रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली शाईन मोटारसायकल, तलवार, एक लॅपटॉप अद्याप मिळालेला नाही. शिवाय राजू नावाचा एक आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख ईशु सिंधू, अपर पोलिस अधिक्षक राहिदास पवार, पोलिस उपअधिक्षक राहुल मदने, पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.

दरोड्याचे वाढीव कलम लावले
या दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी सुरूवातीला जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी दरोड्याचा गुन्हा दडपल्याचा आरोप झाला. मात्र फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आल्याचा खुलासा पोलिस अधिकार्‍यांनी केला. प्रत्यक्षात गुन्ह्याच्या तपासात पाच आरोपींनी गुन्हा केल्याचे उघड झाल्याने पोलिसांना या गुन्ह्यात वाढीव दरोड्याचे कलम लावावे लागले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!