दोन वेगवेगळ्या घटनेत मनमाडमध्ये ५ लाख लंपास

0
मनमाड (प्रतिनिधी)|  मनमाड शहरात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून पहिली घटना गोवा एक्स्प्रेसमध्ये तर दुसरी घटना नाशिक-नांदगाव एसटीत घडली.
गोवा एक्स्प्रेसमध्ये पुण्याच्या प्रवाशाचे  4 लाख 40 हजार रुपये तर  मका विकून घरी घेऊन जाणाऱ्या पानेवाडीच्या शेतकऱ्याचे 68 हजार रुपये एसटीत लंपास करण्यात आले.
एकाच दिवशी रेल्वे आणि एसटीतील प्रवाशांना लुटण्यात आल्याची ही पहिलीच घटना मानली जात असून या घटनांमुळे प्रवाशामध्ये खळबळ उडून भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी मनमाड रेल्वे आणि शहर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले  आहे.
मिनू मुकेश बन्सल आणि त्यांचा तरुण मुलगा गोवा एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून मथुरा ते पुणे असा प्रवास करीत असताना चाळीसगाव-मनमाड दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची बैग लंपास करून पसार झाला.
बैगेत 20 हजार रुपये रोख रकमेसह 4 लाख 20 हजार रुपयांचे दागिने होते. मुलीच्या लग्नासाठी दागिने घेऊन बन्सल जात होत्या.
दुसरी चोरीची घटना मनमाड बस स्थानकावर नाशिक-नांदगाव एसटीत घडली. तोताराम सोनवणे या शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी मनमाड बाजार समितीत 63 क्विंटल मका विकल्यानंतर व्यापाऱ्याने त्याला 68 हजार रुपयांचा चेक दिला होता.
आज हा चेक वटल्यामुळे सोनवणे बैंकेतून पैसे काढल्यानंतर ते पैसे घेऊन घरी पानेवाडीला नांदगाव-नाशिक एसटीत बसला.
तिकीट काढण्यासाठी खिशात हात घातला असता त्यातील सर्व रक्कम गायब झाल्याचे पाहून त्याने आरडाओरडा केला. माझे पैसे एसटीत चोरी झाल्याचे सांगून त्याने एसटी थेट पोलीस स्थानकात नेली.
तेथे सर्व प्रवाशांची झडती घेण्यात आली मात्र पैसे सापडले नाहीत दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*