Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘हॉट स्पॉट’वर आता पोलिसांची ‘नजर’

Share

रोडरोमिओंवर आळा घालण्यासाठी निर्भय मोहीम

अहमदनगर – शाळा, महाविद्यालयांत मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयांत व महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंच्या त्रासात वाढ होत आहे. चौकाचौकांत टारगट मुलांचा मुलींबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थाचालक यांच्यामध्ये जागृती करण्याबरोबरच, अत्याचार व छेडछाडीच्या घटना थांबविण्यासाठी नगर पोलिसांनी निर्भय मोहीम सुरू केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिलासा सेल मार्फत निर्भय मोहीम होत आहे. निर्भय पथकाचे काम छुप्या पद्धतीने सुरू असल्यामुळे टवाळखोर आपोआपच जाळ्यात सापडतात. पूर्वीच्या दामिनी पथकापेक्षा वेगळ्या पद्धतीने या पथकाचे कामकाज सुरू आहे. या पथकाच्या कामकाजाचा आढावा रोज घेतला जातो. शहरामध्ये दोन पुरुष कर्मचारी व दोन महिला कर्मचार्‍यांचे असे पथक आहे.

निर्भय मोहीमेअंतर्गत प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जाऊन रस्ता सुरक्षा, कायद्याचे ज्ञान, कमी वयामध्ये मुले-मुली यांच्या हातून गुन्हे घडले जाऊ नयेत म्हणून जनजागृती, माध्यमिक शाळेतील सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्र पोलीस अधिनियम बाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थाचालक यांचे प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. साध्या वेशातील अधिकारी, महिला व पुरुष पोलीस कर्मचारी यांनी शहरातील छेडछाडीचे हॉट स्पॉट शोधून काढले आहेत. रोज उद्यान, चौक, हॉटेल अशा हॉट स्पॉट आणि इतर ठिकाणी पथकाकडून टेहळणी होते. गरज पडल्यास छुप्या कॅमेर्‍यात हालचाली टिपल्या जातात. संबंधित टवाळखोरांना ताब्यात घेतले जाते.

त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येते. संबंधित टवाळखोरांना तारीख देऊन समुपदेशनाला पोलीस ठाण्यात बोलावले जाते. छेडछाड करणारी मुले लहान असतील तर पालकांना बोलावून समज दिली जाते. दुसर्‍यांदा कारवाईमध्ये कोणी सापडल्यास कोर्टात खटला पाठवला जातो. गेल्या 26 जुलैपासून निर्भय मोहीम सुरू झाल्यापासून शहरातील विविध शाळा, कालेजमध्ये त्रास देणार्‍या आठ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कल्पना चव्हाण यांनी दिली.

शहरातील सर्व कॉलेज, हायस्कूल यांची यादी तयार केली आहे. ज्या ठिकाणी महिलांची, मुलींची छेडछाड होते, असे हॉट स्पॉट शोधून काढले आहेत. या बरोबरच हायस्कूल, कॉलेजला मार्गदर्शन केले जात आहे. त्या ठिकाणी मुलींच्या तक्रारी समजून घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाते. जो मुलगा, पुरुष छेडछाड करत असेल त्यांच्या घरातील पत्नी, आईवडील यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांच्यासमोर समज दिली जाणार आहे.
– सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक, नगर

प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये निर्भय मोहीम घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. यासाठी शाळा, कॉलेजने मदत करावी. निर्भय मोहिमेमधून मुलांमुलींबरोबर संवाद साधून चुकून घडणार्‍या गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. रोडरोमिओंविरोधात पथकाने केलेल्या कारवाईतील मुलांच्या पालकांना बोलवून समज दिली जाणार आहे. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ही निर्भय मोहीम आहे.
– कल्पना चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक (दिलासा सेल, नगर)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!