महाराष्ट्रातील पर्यटनवृद्धीसाठी कोलकत्ता येथे भव्य रोड शो

महाराष्ट्रातील पर्यटनवृद्धीसाठी कोलकत्ता येथे भव्य रोड शो

मुंबई | प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयाच्यावतीने कोलकत्ता येथे नुकतेच भव्य अशा रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शोच्या माध्यमातून तेथील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्राचा समृद्ध पर्यटन वारसा तिथे सादर करण्यात आला.

रोडशोला पर्यटन संचालक दिलीप गावडे, औरंगाबाद विभागीय पर्यटन उपसंचालक श्रीमंत हरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटनावर आधारित सादरीकरण, बी टू बी चर्चासत्रे व प्रश्नोत्तरे तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. पर्यटकांनी महाराष्ट्रातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.

पर्यटनाशी निगडीत सुमारे ८० व्यवसायिक, सहल आयोजक व नामांकीत ट्रॅव्हल एजन्ट यांच्यासमवेत चर्चा करुन त्यांना महाराष्ट्रातील पर्यटन संधींची माहिती देण्यात आली.

पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले की, महाराष्ट्राला प्राचीन, सांस्कृतिक आणि नैसर्गिक असा फार मोठा पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. राज्यातील पर्यटनाला विकासाच्या दिशेने नेताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पर्यटन संचालनालयाच्यावतीने राबविण्यात येतात. राज्यात समुद्र किनारा, किल्ले, लेण्या, गुंफा अशी बरीच पर्यटनस्थळे आहेत. या सर्व पर्यटनस्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांना व्हावी व त्यांनी या स्थळांना भेट देऊन त्याचा आनंद घ्यावा यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणजे देशांतर्गत रोड शोचे आयोजन केले जाते. कोलकत्ता येथे झालेल्या रोड शोला चांगला प्रतिसाद लाभला. पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट देण्यासाठी मोठा रस दाखवला.

          देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटकांना, सहल आयोजकांना व पर्यटन व्यवसायिकांना राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणे, पर्यटनाशी निगडीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, पारंपरिक कला- संस्कृती, हस्तकला, पाककृती आदींची ओळख करून देणे व त्यांच्याशी व्यवसायिक संबंध वृद्धिंगत करून विविध राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करणे हा रोड शोचा मुख्य उद्देश होता, असे पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com