सुनेला जाळणार्‍या सासूला सक्तमजुरी; दिंडोरी तालुक्यातील करंजाळी येथील घटना

0
सुनेवर सतत संशय घेऊन तसेच परपुरुषाशी बोलते या कारणावरून वाद घातल्यानंतर रॉकेल टाकून जिवंत जाळणार्‍या आरोपी सासूला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एच. मोरे यांनी आज दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हौसाबाई निवृत्ती माळेकर (55, रा. कापाची करंजाळी, ता. दिंडोरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी सासूचे नाव आहे. ही घटना 25 एप्रिल 2016 ला दिंडोरी तालुक्यातील कापाची करंजाळी येथे दुपारच्या सुमारास घडली होती. या घटनेत सून अनिता विलास माळेकर हिचा मृत्यू झाला होता.

हौसाबाई माळेकर ही मुलगा विलास व सून अनिता यांच्यासोबत राहत होती. ती सून अनितावर सतत संशय घेत होती. तसेच परपुरुषासोबत तिचे बोलणे हौसाबाईला खटकत असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होते. 25 एप्रिल 2016 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सून अनिता जनावरांच्या गोठ्याची साफसफाई करीत होती.

सासू हौसाबाईने पुन्हा सून अनिता हिला तू परपुरुषाशी का बोलत असते या कारणावरून वाद घातला. या वादानंतर संतप्त हौसाबाईने अनिताला खेचत घरात नेले व तिच्या अंगावर रॉकेल टाकून काडी लावून पेटवून दिले होते. पेटवल्यानंतर घटनास्थळावरून तिने पळ काढला होता. यामध्ये अनिता 64 टक्के भाजली होती. पती विलास व शेजारील नागरिकांनी पेटलेल्या अनिताला विझवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

परंतु अनिताचा उपचारादरम्यान 1 मे रोजी मृत्यू झाला़ मृत्यूपूर्व जबाबात तिने सासू हौसाबाई हिनेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा जबाब दिला होता. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात हौसाबाईवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

12 साक्षीदार व इतर भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले गेले. यामुळे न्यायालयाने सासूला दोषी ठरवत खुनाच्या गुन्ह्याऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. विद्या जाधव यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*