नेवाशात रिक्षाचालक झाला नगरसेवक!

0

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- तेरा ते पंधरा वर्षे रिक्षाने प्रवासी वाहतूक करतानाच प्रामाणीकपणाचा गुण अंगाशी बाळगत, परिसरात सर्वांशी गोड बोलताना वेळेला मदतीला धावून जाता-जाता, झालेल्या या ओळखीच्या जोरावर नगरपंचायत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेऊन केवळ जनसंपर्काच्या जोरावर विजयश्री खेचून आणण्याची करामत सचिन जगदीश नागपुरे यांनी करून दाखवली असून त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर चरितार्थ चालवण्यासाठी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय त्यांनी निवडला होता. नेवासे नगरपंचायत निवडणूक अनेक कारणांनी गाजली. आऱोप- प्रत्यारोपाने तर वातावरण ढवळून निघाले. पहिलीच नगर पंचायत निवडणूक असल्याने अनेक दिग्गज या निवडणुकीत उतरले.

मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी झाली. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच याची इच्छा निर्माण झाली होती. अनेकांना फटका बसला तर काहींना विजय मिळाला. या चुरशीच्या निवडणुकीत एक साधा उमेदवार म्हणून सचिन नागपुरे प्रभाग पाच मधून मैदानात उतरला होता. सामान्य कुटुंबातील असल्याने पाठिशी कसलीही यंत्रणा नाही, पैशाची तर मोठी अडचण, पण निवडणूक तर लढायचीच या विश्‍वासाने नागपुरे याने निवडणुकीची खिंड लढवली.

समाजाचे प्रश्‍न व परिसरातील समस्या सोडवण्यासाठी अनेक आंदोलने केल्याने चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख सर्वत्र झालेली. गेल्या पंचवार्षिकला पत्नी सुवर्णा यांचा 58 मतांनी पराभव झाल्याने यावेळी निवडणूक लढवू नये, कारण निवडणूक म्हटली की मोठा खर्च करावा लागतो, म्हणून मित्र, नातेवाईक व घरच्यांचा विरोध होता. परंतु यावेळी नक्की निवडून येऊ असा विश्‍वास होता. सर्व रिक्षा चालक यांनी पेढ़े वाटून आनंद उत्सव साजरा केला कारण त्यांच्यापैकीच एकजण आज नगरसेवक झाला.

LEAVE A REPLY

*