Type to search

Featured maharashtra

कॅबिनेट सचिवांकडून कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत आढावा; कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी राज्यात आवश्यक सर्व उपाययोजना

Share

मुंबई :

कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी राज्यात आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. बाहेर देशातून येणारी विमाने, जहाजांच्या आगमन स्थानावर तपासणी चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना आज दिली.

केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व राज्यांनी यासंदर्भात केलेली तयारी आणि करावयाच्या उपाययोजनांसदर्भात मुख्य सचिवांकडून आढावा घेतला, त्यावेळी महाराष्ट्र राज्यात कोरोना संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्य सचिव श्री. मेहता यांनी दिली.

कोरोनासंदर्भात आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात, खबरदारी घ्यावी, पण कोणीही घाबरुन जाऊ नये. लोकांनी स्वच्छतेसंदर्भात काळजी घ्यावी. प्रशासनाने आवश्यक औषधे, वैद्यकीय तज्ञ, विलगीकरण कक्ष, आवश्यक मास्क यांची उपलब्धता करावी. हवाई, जल किंवा भूपृष्ठ मार्गावरील आगमन स्थानकांवर परदेशातून येणाऱ्या व्यक्तींच्या आवश्यक चाचण्या करण्यात याव्यात, अशा सूचना श्री. गौबा यांनी दिल्या.

राज्यात करण्यात आलेल्या तयारीची माहिती देताना मुख्य सचिव श्री. मेहता म्हणाले की, कोरोनासंदर्भात राज्यात आतापर्यंत २८० जणांपैकी २७३ जणांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत. उर्वरीत ७ जणांच्या चाचणीचा रिपोर्ट येणे बाकी आहे. प्रत्येक जिल्ह्यात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून त्यात ४९६ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत.

याशिवाय मुंबई, पुणे, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या सुरु आहेत. जल मार्गाने येणारे क्रुझ इत्यादींनाही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!