काम नाही तर वेतन नाही; महसूल कर्मचारी संपाबाबत प्रशासनाचा कारवाईचा बडगा

0
नाशिक । महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी गत दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी लागलीच काम नाही तर वेतन नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत कर्मचार्‍यांना इशारा दिला आहे. त्यामुळे आता आंदोलक कर्मचार्‍यांची चांगलीच अडचण झाली आहे.

महसूल लिपिकाचे पद बदलून महसूल सहायक करावे, पुरवठा निरीक्षक हे सरळ सेवेने न भरता महसूल लिपिकातूनच त्यांना पदोन्नती द्यावी यासह गत चार-पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध दहा मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने राज्यभर आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातही कर्मचार्‍यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवल्याने महसूल विभागाचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे.

आज दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलादारांच्याच बैठका घेण्याची वेळ जिल्हाधिकार्‍यांवर आली. दुसरीकडे कर्मचारी कार्यालयात येऊन आपली हजेरी लावत आहेत, परंतु काम करत नसल्याने उगाच त्यांना पगार कसा देणार, असा सवाल उपस्थित करत जिल्हाधिकार्‍यांनी काम करणार नसाल तर पगार मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

तसे आदेशही कर्मचार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आंदोलन काळातील पगार कर्मचार्‍यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्या मान्य व्हाव्यात यासाठी संपाबाबत कर्मचारी ठाम आहेत. जिल्ह्यातील 253 अव्वल कारकून, 343 लिपिक, वाहनचालक 41 तसेच 182 शिपाई तसेच 24 पदोन्नत नायब तहसीलदार असे एकूण 843 कर्मचारी सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

*