महसूल कर्मचारी व मुद्रांक विक्रेते संपावर

0

शेवगावात शंभर टक्के पाठिंबा; श्रीगोंद्यात नागरिकांची कामे खोळंबली

महसूल कर्मचार्‍यांच्या मागण्यामहसूल कर्मचार्‍यांच्या मागण्या  नायब तहसीलदार या पदाचा ग्रेड पे वाढवणे, शिपाई संवर्गातून तलाठी पदावर पदोन्नती मिळणे, दंगत समितीचा अहवाल जसाच्या तसा स्वीकारणे, पुरवठा निरीक्षकांची सर्व पदे पदोन्नतीने भरा, महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहायक करावे आदी मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याने हा संप सुरु केला आहे.

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – महसूल कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कालपासून बेमुदत संपावर गेले आहेत. शेवगाव तालुक्यात या संपाला 100 टक्के पाठिंबा मिळाला असल्याचा दावा या संघटनेचे तालुका अध्यक्ष ए. ए. शेख यांनी केला आहे.
या आंदोलनात महसूल विभागातील शिपाई, कनिष्ठ लिपिक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार (पदोन्नत) यांचा सहभाग असल्याने शासकीय कामकाज ठप्प होणार आहे. नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, संघटनेचे उपाध्यक्ष ए. डी. कुलकर्णी, सचिव ए. आर. नरोड व कोषाध्यक्ष आर. एम. अन्नदाते, कलीम शेख, भाऊसाहेब दळे यांच्यासह सदस्यांनी काल सकाळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीपक पाटील यांना दिले.

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – महसूल कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन केल्याने सकाळ पासूनच अनेक महसूल कर्मचार्‍यांनी कार्यालयाकडे पाठ फिरवली. तालुक्याच्या विविध भागांतून तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना विनाकारण हेलपाटा मारावा लागला.
श्रीगोंदा तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन केल्याने सकाळ पासूनच तहसील कार्यालयाच्या आवारात आलेल्या नागरिकांना आपले काम न करताच पुन्हा परतावे लागले. शनिवार, रविवार निवडणुकीचे काम आणि सुट्टी असल्याने अनेक जण श्रीगोंदा येथे सोमवारी आले. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामुळे तहसील कार्यालयातील कोणतेही काम झाले नसल्याने मंगळवारी अनेक गावातील नागरिक तहसील कार्यालयातील कामासाठी आले. मात्र लेखणी बंद असल्याने कोणतेही काम होऊ शकले नाही. सध्या शाळेचे दाखले मिळवण्यासाठी विविध प्रतिज्ञापत्र तयार करणे आदी महसूल विभागातील काम होऊ शकली नाहीत.

पाथर्डी (प्रतिनिधी) – पाथर्डी तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक आपल्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवार 9 पासून राज्यव्यापी संपावर गेले आहेत. या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू झाले असून अडचणीचा सामना करावा लागत आहे.
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संपावर गेले आहेत. पाथर्डी मुद्रांक विक्रेते रमेश जोशी व लेखनिक संघटनेच्यावतीने सलाम पठाण यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
या निवेदनात राज्यातील प्रचलित मुद्रांक छपाई सरकार बदलण्याच्या विचारात असून हा निर्णय घेऊ नये, त्यामुळे मुद्रांक विक्री करणार्‍यांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. सध्या भांडवल वापरून सुद्धा रोजंदारी मिळत नाही, त्यामुळे 10 टक्के कमिशन मिळावे, सध्या शासनाने सुरु केलेल्या ई सुविधा व ई एस बी आर टी प्रणाली आमच्यामार्फत सुरू करावी. वारसांना परवाना मिळावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संप सुरू केला आहे. तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देतेवेळी एकनाथ पाठक, दिलीप दहिफळे, आसाराम पालवे, सुभाष रोडी, मधुकर नलवडे उपस्थित होते.

जामखेड (प्रतिनिधी) – राज्यातील प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांक विक्रेत्यांना दहा टक्के कमिशन मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यात दोन वर्षांपूर्वी रुपये एक हजार व त्या पुढील मुद्रांकाची छपाई वितरण व विक्री बंद करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांवर मोठा अन्याय केला आहे.
या अन्यायाचा महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन प्रतिकार केला व अन्याय दूर व्हावा याकरिता अनेक वेळा सनदशीर मार्गाने शासनाकडे विनंती केली होती. परंतू सरकारच्या संबंधीत मंत्रालयाने व अधिकारी यांनी मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्यांकडे हेतुस्पर दुर्लक्ष केले आहे. यामुळे दिनांक 9 ऑक्टोबर 2017 पासून राज्यात मुद्रांक विक्री, दस्तावेज लेखन व ई चलन व ईएसबीटीआर तयार करणे व इतर सर्व कामे मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जामखेड मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक संघटनेच्यावतीने तहसीलदार व दुय्यम निबंधक जामखेड यांना आपल्या बेमुदत आंदोलना बाबत लेखी निवेदन दिले आहे. निवेदनावर महादेव डुचे, नासीर पठाण, रामचंद्र राळेभात,अभय किंभवणे यांच्या सह्या आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*