Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

खंडकर्‍यांना वर्ग-1 जमिनी देण्यासाठी प्रयत्न – महसूलमंत्री थोरात

Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – खंडकरी शेतकर्‍यांच्या अतिक्रमण, रस्ता, पाटपाणी या अडचणी सोडवून जमीन वाटपाचा प्रश्‍न येत्या सहा महिन्यांत संपवून टाकू तर खंडकर्‍यांना आता जमिनीचे वाटप करताना त्या वर्ग-2 ऐवजी वर्ग-1 देण्याबाबत प्रयत्न करू, असे आश्‍वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे ना. थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत खंडकरी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासंदर्भात आढावा बैठक काल पार पडली, यावेळी ते बोलत होते.खा. सदाशिव लोखंडे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, राहुरीचे तहसीलदार श्री. शेख, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी श्री.शिंदे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, पं.स. सदस्या डॉ. वंदना मुरकुटे, माजी जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे, पं.स. सदस्य अरुण नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, खंडकरी चळवळीचे नेते कॉ. आण्णा पाटील थोरात, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्‍वर मुरकुटे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी खंडाळा येथील तान्हाबाई नारायण शिंदे, कारभारी किसन तुपे, पिर मोहम्मद उस्मान जहागिरदार व उक्कलगाव येथील इमाम अब्दुल वहाब या चार शेतकर्‍यांना 7/12 उतार्‍याचे ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रास्ताविक तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले.
यावेळी खंडकरी शेतकर्‍यांनी अतिक्रमण, पाटचार्‍याचा प्रश्‍न, रस्ता, गावातच जमिनी मिळाव्यात यासह विविध मागण्या मांडल्या.

यावेळी ना. थोरात यांनी शेतकर्‍यांचे प्रश्‍न समजावून घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले. तालुक्यात मनुष्यबळ कमी असल्याने काही प्रमाणात जमिन मोजणी प्रक्रियेविना राहिली आहे. त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देऊन एक महिन्याच्या आत त्यांचा प्रश्‍न सोडवू. तसेच मोजणी करताना ज्या शेतकर्‍यांच्या शेतातून चारी गेलेली आहे ते क्षेत्र सोडून मोजणी करुन देण्याबाबत ना. थोरात यांनी सांगितले.

आ. लहु कानडे म्हणाले, शेती महामंडळाच्या ज्या जागेवर थोड्या फार प्रमाणात अतिक्रमण करुन आदिवासी नागरिक राहतात. त्या जमिनी शेती महांमडळाने वाटपासाठी काढल्या आहेत. मात्र असे झाल्यास त्यांची घरे उजाड होतील त्यामुळे असे नागरिकांची घरे बेघर करु नये, अशी मागणी केली.
शासन निर्णयाप्रमाणे श्रीरामपूर तालुक्यात 610 शेतकरी पात्र असून त्यांना एकूण 4074 एकर जमीन वाटप करण्यात येणार आहे.

टिळकनगर मळ्यात 123 शेतरकर्‍यांना अद्याप जमिनी वाटप करण्यात आल्या नाहीत. त्यामध्ये 8 शेतकर्‍यांची प्रकरणे वारसाच्या वादावरुन न्यायप्रविष्ठ आहेत. 64 शेतकर्‍यांनी आपल्याला गावातच जमीन पाहिजे, अशी मागणी केली आहे. 106 शेतकर्‍यांची जमीन मोजणी बाकी आहे. तर मोबदला देण्यावरुन 1 शेतकर्‍याची तर 1 शेतकर्‍यांच्या जमीनीत अतिक्रमण झालेले आहे.

तर हरेगाव मळ्यात 17 शेतकरी वाटपापासून वंचित आहेत. त्यात 6 प्रकरणे वारस मुद्यावरुन न्यायप्रविष्ठ आहेत, गावातच जमीन पाहीजे अशी 5 शेतकर्‍यांची मागणी आहे. तर 61 शेतकर्‍यांची अद्याप मोजणी बाकी आहे. 3 शेतकर्‍यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत. मात्र सर्व निकषात पात्र ठरलेले शेतकरी तालुक्यात 432 असून त्यांना 4051 एकर क्षेत्र वाटप करावयाचे आहे. अंतिम नमुना 3 नुसार 376 शेतकर्‍यांना 3098 एकर क्षेत्र वाटप करण्यात आले आहे. तर 86 शेतकर्‍यांचे 889 एकर क्षेत्र बाकी आहे. एकूण जमीन वाटपाची प्रक्रीया सुमारे 90 टक्के पूर्ण झाली असून किरकोळ वाटप राहलेले आहे. त्याची प्रक्रीया येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश महसुलमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, खंडकरी नेतेे कॉ. आण्णा पाटील थोरात, इंद्रनाथ थोरात, सुधिर नवले, प्रविण फरगडे आदींसह अनेक शेतकर्‍यांनी खंडकर्‍यांच्या जमीनीतील अतिक्रमण काढावे, पाटपाणी मिळावे, वर्ग एकचा सातबारा उतारा मिळावा, शेतात पाण्याच्या चार्‍या सोडून मोजणी करावी, अशी मागणी केली.
…………
पाणी हा हक्क!
जे शेतकरी याप्रश्‍नी न्यायालयात गेले आहेत त्याप्रश्‍नी प्रांताधिकारी व शेती महामंडळाचे अधिकारी यांची बैठक घेऊन सामंजस्याने हा प्रश्‍न सोडविण्यात येईल, तर नातेवाईकांचे आपसातील प्रश्‍नही प्रांताधिकारी, तलाठी, सर्कल यांच्यामार्फत सोडविण्यात येतील. खंडकरी शेतकर्‍यांच्यादृष्टीने महत्वाचा असणारा पाटपाण्याचा प्रश्‍नही प्राधान्याने सोडविण्यात येईल, त्यासाठी शेतकर्‍यांनी 7 नंबर पाणी अर्ज करुन पाण्याची मागणी करावी, शेतीसाठी पाणी मिळणे हा हक्क असून त्याबाबत कुणावरही अन्याय होऊ न देण्याची ग्वाही ना. बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!