Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसेवानिवृत्त लष्करी जवान पोलिसांच्या मदतीला

सेवानिवृत्त लष्करी जवान पोलिसांच्या मदतीला

मनमाड । प्रतिनिधी

आम्ही सैनिक आहोत आणि देशसेवा आमच्या रक्तात आहे. देश आणि शहरावर करोनाचे संकट आल्यावर घरात कसे बसणार? अशा भावना सेवानिवृत्त लष्करी जवान यांनी व्यक्त केल्या.

- Advertisement -

अदृश्य शत्रू असलेल्या करोनाला हरवण्यासाठी या युद्धात अनेक जण उतरले असून या सर्वांचे एकच ध्येय आहे ते करोनाला देशातून हद्दपार करणे. या युद्धात इतर घटकांसोबत आता सेवानिवृत्त लष्करी जवानदेखील मैदानात उतरले आहेत. शहर परिसरातील सुमारे 35 सेवानिवृत्त लष्करी जवान हे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत आहेत तेदेखील विनामोबदला.

भारतासह संपूर्ण जगात करोना महामारीने थैमान घातले असून या आजाराने अनेकांचा बळी गेला आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याबरोबरच कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रेवर कामाचा ताण वाढला आहे. करोनाला हरवण्यासाठी डॉक्टर्स, पोलीस, नर्स, सफाई कामगार आदींसह सर्व शासकीय अधिकारी व सेवक आपले जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्यासोबत सेवानिवृत्त लष्करी जवानदेखील मागे नाहीत.

सुमारे 18 ते 20 वर्षे सीमेवर देशसेवा केल्यावर सेवानिवृत्त झाल्यानंतर सुमारे 35 जवान हे मनमाडपासून 4 ते 7 कि.मी. अंतरावर नागापूर, पानेवाडी परिसरात असलेल्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या इंधन प्रकल्पात सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागले. सध्या करोनाचा प्रकोप वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले ओत. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले. मात्र त्यांची संख्या कमी असल्याचे पाहून सेवानिवृत्त लष्करी जवान सरसावले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे सेवानिवृत्त लष्करी जवान येथेही त्यांचे कर्तव्य बजावत आहेत.

सायंकाळी इंधन प्रकल्पातून सुटी झाल्यानंतर हे जवान घरी जातात आणि फ्रेश होऊन शहरातील चौकाचौकांत उभे राहून कायदा व सुव्यस्था आबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यापैकी काहींची ड्युटी शहरात निर्माण केलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या भाजीपाला मार्केटमध्ये तर काहींची पुणे-इंदूर महामार्गावर तर काहींची नाकाबंदी व चेकपोस्टवर ड्युटी लावण्यात आली आहे. कोणताही मोबदला न घेता हे सेवानिवृत्त जवान करोनाच्या रूपाने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी जनतेची सेवा करत आहेत. सर्व करोना योद्धे असून त्यांचे शहरातील सव्वालाख नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या