वडगावपानच्या सरपंच शोभा थोरात यांचा राजीनामा

0
तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या वडगावपान येथील ग्रामपंचायतच्या सरपंच शोभाताई यशवंत थोरात यांनी विहित नमुन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संगमनेर पंचायत समितीच्या सभापती निशाताई कोकणे यांच्याकडे सदर राजीनामा सुपूर्द करण्यात आला असून तो पडताळणीसाठी ग्रामपंचायतकडे पाठविण्यात आला आहे.
वडगावपान ग्रामपंचायतची सरपंच-उपसरपंच निवडणूक दि. 28 ऑगस्ट 2015 रोजी घेण्यात आली होती. सरपंचपदी शोभाताई यशवंत थोरात यांची, तर उपसरपंचपदी अर्जुनराव केशव काशिद यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. निवडीच्यावेळी सरपंचपदासाठी अडीच वर्षे कार्यकाल निश्‍चित करण्यात आला होता. मात्र दोन वर्षांनतर सरपंच शोभाताई थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
त्यांच्या राजीनाम्याचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. मात्र निवडीच्यावेळी ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण होण्यास सहा महिने बाकी असतानाच त्यांनी राजीनामा दिला. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वडगावपान सुरेश शिंदे यांनी सदर राजीनामा पडताळणी कामी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत ठेवून त्याचा अहवाल संगमनेर पंचायत समितीकडे पाठविण्यात यावा असे पत्र ग्रामविकास अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
सोमवार दि. 31 जुलै रोजी होणार्‍या वडगावपान ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत शोभाताई थोरात यांच्या सरपंचपदाच्या राजीनाम्याची पडताळणी करून राजीनाम्यावर शिक्कमोर्तब होईल. सरपंच शोभाताई थोरात यांचा राजीनामा मंजूर झाल्यास रिक्त होणार्‍या जागेवर ग्रामपंचायत सदस्य पद्मा तान्हाजी थोरात व आशा कैलास कुटे यापैकी कुणाची वर्णी लागणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

LEAVE A REPLY

*