आरक्षण न दिल्यास धनगर समाज सरकारचा बळी घेईल

0

प्रकाश शेंडगे : एकनाथ खडसेंचा आरक्षणाला पाठिंबा

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्याची सत्ता भाजपच्या हाती द्या, पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो, असे आश्‍वाासन देणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खूपसण्याचे काम सुरू आहे. विरोधीपक्ष नेते ते पंढरपूरच्या मेळाव्यापर्यंत आ. एकनाथ खडसे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनेच भूमिका घेतलेली आहे. यापुढेही ते धनगर आरक्षणाच्या भूमिकेसोबत राहणार आहेत. येत्या 8 सप्टेंबरपर्यंत सरकारने धनगर समाज आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा धनगर समाज सरकारचा राजकीय बळी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धनगर समाजाचे नेते तथा माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी दिला.

नगरच्या शासकीय विश्रामगृहावर शेंडगे माध्यमांशी बोलत होते. 1956 कायलकर कमिशनने धनगर समाज मागासलेला असल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार केंद्र सरकारने कार्यवाही केली. मात्र, राज्याच्या यादीत धनगर ऐवजी धनगड असे टाकण्यात आले. वास्तवात हा विषय उच्चार शास्त्राशी निगडीत आहे. मराठीतील धनगरचा उच्चार हिंदी धनगड होतो. मात्र, यावरून गेल्या चार पिढ्यांपासूून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला.

यापूर्वी राज्यातील सत्तेत विरोधात असताना आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, खडसे यांनी धनगर आरक्षणाच्यादृष्टीने भूमिका मांडलेली आहे. एवढचे काय बारामतीच्या सभेत कपाळाला भंडारा लावत राज्यातील सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो असे म्हणणारे फडणवीस सरकार चार वर्षांपासून 250 कॅबिनेटच्या बैठकांनंतर धनगर आरक्षणाबाबत अभ्यास सुरू असल्याचे सांगत आहे. ही धनगर समाजाची फसवणूक असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला.

सरकारने टाटा संस्थेला धनगर समाजाच्या अभ्यासाचे काम दिले असून ही संस्था धनगर समाज मागासलेला आहे का? या समाजाचे बांधव दारू पितात का? या समाजातील महिला कोणत्या साड्या नेसतात असे प्रश्‍न विचारून समाज बांधवांची कुचेष्टा आणि अपमान करत आहेत. यामुळे आता समाज बांधवांसमोर आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही. पुण्यात झालेल्या बैठकीत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. 14 तारखेला नगरसह राज्यात जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांवर मेंढ्यासह मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर 8 सप्टेंबरला चोंडी (ता. जामखेड) याठिकाणी मेळावा घेऊन सरकार विरोधात निर्णायक भूमिका घेण्यात येणार आहे. सरकारने आरक्षण न दिल्यास धनगर समाज सरकारचा राजकीय बळी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेंडगे यांनी यावेळी दिला. यावेळी अण्णासाहेब बाचकर, दादाभाऊ चितळकर आदी उपस्थित होते.

नगरचे पालकमंत्री राम शिंदे हे सरकार आणि समाज बांधवांत समन्वयकाची भूमिका निभावत आहेत. पुण्यात झालेल्या बैठकीत त्यांनी आरक्षणाच्या बाजूने राहण्याचे मान्य केले आहे. दुसरे मंत्री महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणानंतर हेलिकॉप्टरमधून राज्यभर भंडारा उधळण्याची घोषणा केली होती. समाज बांधव आजही त्यांच्या हेलिकॉप्टरची वाट पाहत असल्याचा टोला शेंडगे यांनी यावेळी लगावला.

पत्रकार परिषदेनंतर शेतकरी मराठा महासंघाचे राजाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी शेंडगे यांचा सत्कार करत धनगर आरक्षणाला मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे जाहीरपणे सांगितले. राज्य सरकारने मराठा आरक्षणासह धनगर समाजाला तातडीने आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

*