आरोग्याची सुविधा अपुरी; पण मुले इंग्रजी शाळांमध्ये

0

नाशिक जिल्ह्यातील गावांची स्थिती कशी आहे? शेती पाणी यांसह योजनांची काय स्थिती काय आहे?  यासाठी आम्ही जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या. त्या भेटीचा वृत्तांत ‘रिपोर्टरची डायरी’ रूपाने येथे मांडत आहोत.

कळवण-देवळा रस्त्यावरून कळवण तालुक्याची शीव ओलांडली की आपण देवळा तालुक्यात शिरतो. येथूनच उजव्या हाताला खर्डे गाव आहे. हा जूनचा पहिला आठवडा होता. पाऊस नसल्यामुळे येथील संपूर्ण शेती ओसाड दिसत होती.

काही शेतकरी येणाऱ्या खरिपाच्या मशागतीत गुंतलेले दिसले. अनेकांनी वावरात शेणखत टाकून ठेवले होते. यंदा पाऊस चांगला झाला तर नक्कीच उत्पन्न वाढेल अशी आशा एक दोघांनी बोलून दाखविली.

खर्डे गावात कृष्णा जाधव यांच्याशी भेट झाली. ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत. गावातील शिक्षण पद्धतीवर त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अनेकांनी आपल्या मुलांची नावे दाखल केली आहेत.

घरी मराठीही धड न बोलता येणारे पालक मुलांना इंग्रजी शाळेत कशासाठी पाठवतात? त्यातून मुलांचा शैक्षणिक पाया कसा पक्का होणार? असा प्रश्न त्यांनी मांडला. खासगी इंग्रजी शाळांच्या माध्यमातून ‘शिक्षणाचे व्यापारीकरण’ या गावापर्यंत पोहोचल्याची सल त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती.

एकीकडे खासगी इंग्रजी शाळांचे लोण पोहचलेल्या या गावात आरोग्य सेवा मात्र अजूनही चांगल्या नाहीत. येतील सरकारी दवाखान्यात सर्पदंश, रेबीज सारख्या लसी उपलब्ध नसतात. त्यासाठी अनेकांना १०-१२ किमी प्रवास करून उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागते. तक्रारी करून झाल्या, पण स्थिती काही सुधारली नाही, असे ग्रामस्थ सांगतात.

हे गाव पूर्णपणे हागणदारी मुक्त झाल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी केला असला, तरी गावाच्या बाहेर काहीशी अस्वच्छता दिसून आली. येथील एका वस्तीवर आताची पंतप्रधान आवास योजना आणि पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेतून अनेकांनी सिमेंटची पक्की घरे बांधलेली आहेत. उज्वला योजनेतून अनेक आदिवासी कुटुंबांनी गॅस सिलेंडर मिळवले आहे. पण त्याचा वापर बरेज जर करत नाहीत. काही शेतमजूरांनी भितीपोटी त्यांच्या मालकाकडे सिलेंडर ठेवली असल्याचे एकाने सांगितले.

 

एकीकडे ही स्थिती असली, तरी गावात सर्वांकडेच स्मार्टफोन दिसतात, त्यावर अनेकजण इंटरनेटचा वापर करतात. काही शेतकऱ्यांकडे तर ॲपलसारखे ब्रँडेड फोनही आहेत, हे विशेष.

खर्डेपासून देवळा रस्त्यावर वाजगावची हे ५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. येतील संपूर्ण शेती बागायती आहे. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षे लागवड केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनातून याठिकाणची द्राक्षे देशातील विविध बाजारपेठेत जातात. त्यामुळे अनेकांच्या शेतात अलिशान बंगले दिसून येतात. महिला शेतकऱ्यांची संख्या देखील येथे मोठी आहे.

याठिकाणी महिलाच स्वतः मजुरांसोबत शेतीची सर्व मुख्य कामे करताना दिसतात. ट्रॅक्टरच्या साह्याने येथील जास्तीत जास्त शेती केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी कोबी,  फ्लॉवर पिकांसह  मल्चिंग पेपर टाकून मिरचीची लागवड केलेली दिसून येते.

 

AUTO STARTER FILE PHOTO

अशिक्षित शेतकरीदेखील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देत आहेत. अनेकांनी विहिरीवरील पंपावर ऑटो स्टार्टर बसविलेले आहेत. मोबाईलवरूनही ते मोटार सुरू करतात. शेतापासून लांब असलेल्या विहिरीवर वारंवार चकरा माराव्या लागतात, शिवाय वीजेचा लपंडाव आहेच. यासर्वांवर शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानातून हा उपाय शोधला आहे.

येथील अनेक शेतकरी शेतीत नवनवीन बदल करत आहेत. ते विविध कृषी संमेलनांना भेटी देतात, तज्ज्ञांशी चर्चा करतात आणि शेतीचा अभ्यास करून त्यानुसार शेती करतात. सोशल मीडियाचाही वापर शेतकरी शेतीसाठी करत असल्याची माहिती येथील शेतकरी प्रदीप देवरे देतात.

 

वाजगावला जवळची बाजारपेठ देवळा, उमराणे, सटाणा किंवा शेवटचा पर्याय कळवण आहे. येथील काही शेतकरी रोख पैसे मिळतात म्हणून  ट्रॅक्टरने लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील बाजारपेठदेखील गाठतात. जेव्हा शेतकऱ्याला भांडवलाची आवश्यकता असते तेव्हाच येथील शेतकरी लासलगाव किंवा पिंपळगाव येथील बाजारपेठेत शेतमाल विक्रीसाठी नेतात.

वाजगावात आदिवासी वस्तीवर रमाई आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना व पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल मिळाले आहेत. आदिवासी वस्तीवरील अनेक मुलांना शाळेत पाठवले जात असून अनेकजण शहरात नोकरीलादेखील असल्याची समजले.

शासनाच्या उज्ज्वला योजनेतून याठिकाणी गॅस वितरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी गॅसचा वापर सुरु आहे, तर काही ठिकाणी सरपणाची कमतरता भासल्यावर गॅस वापरतो असे सांगण्यात आले. (क्रमश:)

  • दिनेश सोनवणे, देशदूत डिजिटल

LEAVE A REPLY

*