बदली प्रक्रियेत पुन्हा शिक्षकांकडून बोगस प्रमाणपत्रे

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संगणकीय ऑनलाईन प्रणालीव्दारे होत असलेल्या या बदली प्रक्रियेत अनेक त्रुटी असून काही शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे जोडून बदलीबाबत शासनाने दिलेल्या सवलतींचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी केली आहे.
यासंदर्भात शिक्षकांनी बुधवारी सायंकाळी उशीरा मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांची निवेदन देत चौकशीची मागणी केली. यावेळी शिक्षक नारायण पिसे, विजय नरवडे, भास्कर कराळे, गोरक्षनाथ तोडमल, अंबादास गारूडकर, शरद गिरवले, बाहासाहेब कापसे, अकबर शेख, ईश्‍वर नागवडे, बाळासाहेब सोनवणे, राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते.
माने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, बदली प्रक्रियेवेळी जिल्ह्यातील संवर्ग एक मधील अनेक शिक्षकांनी बोगस हृदयशस्त्रक्रिया, पक्षाघात असे प्रमाणपत्र जोडले आहेत. अपंगत्वाचे दाखले जोडलेल्या शिक्षकांकडे चक्क वाहन चालविण्याचे ड्रायव्हिंग लायसन्स आहेत.
संवर्ग 2 मधील काही शिक्षकांनी 30 किलोमीटरपेक्षा कमी अंतर असतांना जास्त अंतर असल्याचे दाखवून संवर्ग दोनचा लाभ घेतला आहे. याशिवाय काही शिक्षकांनी खासगी सहकारी संस्था, पतसंस्था, इंग्रजी शाळा यात सेवेत असल्याचे बोगस प्रमाणपत्रे जोडून पती-पत्नी एकत्रीकरण योजनेचा लाभ घेतला आहे.
एकत्रीकरणाचा लाभ घेताना काहींनी शहराजवळ 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतराची नावे टाकली आहेत. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, तसेच खर्‍या अपंग व पती पत्नी एकत्रिकरणाच्या शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

*