कन्यादानापर्यंत बाप जगावा म्हणून कर्जमाफी करा

0
नाशिक : एकीकडे शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे शेतमाल पिकवूनही त्याला योग्य हमीभाव मिळत नाही. सर्वच शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागत आहे. अशात समृद्धी नावाचे नवीन संकट उभे राहिले, त्याचे नाव ऐकूनच शेतकर्‍यांच्या मनात धडकी भरत आहे.

त्यातूनच शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. शेतकर्‍यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी भीख म्हणून नव्हे तर किमान आमचे कन्यादान करेपर्यंत आमचा बाप जिवंत राहावा म्हणून तरी कर्जमाफी करा, अशी आर्त हाक शिवडे येथील शेतकरी मंगला चव्हाणके, साक्री येथील प्रियंका जोशी यांच्यासह आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची पत्नी कल्याणी ठाकरे यांनी सरकारला दिली.
शेतकर्‍यांच्या या व्यथा ऐकताना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. तर दुसर्‍या बाजूला ही वेळ आणणार्‍या राज्य शासनाविरोधात तीव्र रोषही व्यक्त होताना दिसत होता.

शिवसेनेतर्फे आयोजित शेतकरी अधिवेशनात अनेक शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी या तिन्ही शेतकरी कन्यांनी शेतकर्‍यांची करुण कहाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व इतर मंत्र्यांसमोर मांडली. यावेळी बोलताना प्रियंका जोशी म्हणाली, शेतकरी आणि त्याची मुले इतकी अभागी आहेत की दुष्काळ आणि इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर बापाची काळजी वाटते. बाप स्वत:चे काही बरेवाईट करेल की काय या काळजीने रात्रभर बापाकडे लक्ष ठेवून राहावे लागते.

सटाणा येथील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची पत्नी कल्याणी ठाकरे आपल्या व्यथा मांडताना म्हणाल्या, कर्जाला कंटाळून माझ्या सुशिक्षित नवर्‍याने मुलगा 9 महिन्यांचा असताना आत्महत्या केली. डोक्यावर 15 लाख रुपयांचे कर्ज आहे. सासूला कॅन्सर आहे. मुलगा आज 25 महिन्यांचा असून तो 25 वर्षांचा होईलपर्यंत कर्जाचा डोंगर आणखी मोठा होईल.

बापाविना पालनपोषण केलेल्या माझ्या मुलाने कर्जाला कंटाळून नवर्‍याप्रमाणे आत्महत्या केली तर मी कोणाकडे पाहायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र संपूर्ण कर्जमुक्त झाल्याशिवाय माझी ही लढाई पूर्ण होणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील मंगला चव्हाणके हिने समृद्धी प्रकल्पात बाधित शेतकर्‍यांची कहाणी मांडली. ती म्हणाली, हातातील कर्जाच्या बेड्या गळ्यातील फास होत असताना समृद्धी नावाची नवीन बरबादी सुरू झाली आहे.

बापाची दीड एकर जमीन समृद्धीत जाणार असल्याने कोणी नवीन कर्ज देण्यास तयार होत नाही. मी उच्चशिक्षण घ्यावे असे बापाचे स्वप्न आहे.

मात्र पैसे भरू शकत नसल्याचे त्यांचाही नाईलाज होत असल्याने पुढील शिक्षण घेता येत नसल्याचे तिने सांगितले. शेतीपासून पोरक्या होण्याच्या भीतीने अनेकांना धडकी भरत असल्याचेही तिने सांगितले.

LEAVE A REPLY

*