Type to search

दिवाळी - अनुभव (गावाकडची दिवाळी)

आठवणी : मनात रेंगाळणारी ‘ती’ दिवाळी!

Share

सारेच सण-उत्सव नीरस वाटू लागलेत आता. सण येतात आणि जातात, तेजाचा, मौजेचा रंग असा मागे सोडून जात नाहीत हल्ली. सणापूर्वी हवीहवीशी चाहूलही लागत नाही आताशा.

अशावेळी बालपणी अनुभवलेल्या दिवाळीचे दिवे तेजाळतात लख्खपणे अंतर्मनात. त्या तेजात आमचं उपनगरचं जुनं घर लक्ष दिव्यांनी मनीध्यानी उजळत राहातं, आठवांना उजाळा देतं. सहामाही परीक्षा संपली की, आम्ही सहाही भावंडं इतरांसारखीच दिवाळीस्वप्नं बघत असू. कुटुंब मोठं आणि घरात कमावता एकच म्हणून प्रत्येकाला वर्षातून एकदाच नवीन कपडे मिळायचे.

त्यासाठी आमची आवड कधीच लक्षात घ्यायची गरज मोठ्यांना वाटली नाही. आई कापडाचा मोठा तागा आणून घरासमोरील क्षीरसागर मावशींकडून पाचही बहिणींसाठी फ्रॉक शिवून घ्यायची एकसारखे. एकाच दिवशी सर्व बहिणी माप द्यायला जात असू. घराला रंग देण्याचा ‘कौटुंबिक कार्यक्रम’ व्हायचा, कारण बाहेरून रंगारी न बोलवता दादा, आई, आत्या आणि आम्ही सारे मिळून घर रंगवायचो. भांडी घासण्याचा, साफसफाई, झाडझटक करण्याचा जोरदार कार्यक्रम घराघरात चाललेला असायचा.  घर आवरून झालं की, थेट घरापर्यंत खास रिक्षा करून आई-दादा किराणा घेऊन यायचे. क्वचित कधी दादांनी सायकलला मागे बांधून वा पुढे हँडलला अडकवून किराण्याच्या पिशव्या आणलेल्या आठवतात.

मग वेध लागायचे ते फराळाच्या पदार्थांचे. आम्ही सर्वजण शाळेत होतो तोपर्यंत आईने कधीच दिवसा फराळाचे पदार्थ बनवले नाहीत. आम्ही सारी ‘उद्योगी गँग’ झोपी गेली की, मोठी बहीण, आत्या आणि आई रात्री उशिरापर्यंत फराळाचे पदार्थ बनवायच्या.

सकाळी झोपेतून उठलो की, तळणाचा खमंग, खरपूस हवाहवासा सुगंध घरभर दरवळत असायचा आणि नेहमीप्रमाणे आपण झोपी गेल्यावर प्रकरण ‘शिजलं-भिजलं-तळलं’ गेलंय हे आम्हाला समजायचं. दिवाळीतील मुख्य आकर्षण म्हणजे फटाके.

आदल्या दिवशी दादा फटाके आणत आणि दिवाळीच्या दिवशी सायंकाळी त्याची समान सहा भागात वाटणी करत. प्रत्येकजण वाटे समान आहेत नं? खात्री करून घ्यायचे. वाटून दिलेले फटाके दिवाळीचे पाच दिवस पुरवून वापरायचे, संपले तर पुन्हा मिळणार नाहीत ही तंबी न चुकता दादांनी दिलेली असायची.

मग काय आपले फटाके सुरक्षित ठेवून आम्ही इतरांची गंमत बघत बसायचो. आदल्या दिवशी आत्या आणि मी जाऊन शेवंतीच्या सात वेण्या  नेहमीच्या फुलवालीला सांगून यायचो. पुढे आत्याचे लग्न झाले आणि वेण्यांची संख्या सहा झाली. आदल्या दिवशी हातावर मेहंदी काढण्याचा  एक कार्यक्रम व्हायचा.

मेहंदीच्या झाडाची हिरवी पानं पाट्यावर वाटून, लिंबू पिळून भिजवायचे आणि रात्री झोपताना हाताच्या पंजावर ती चोपडायची. नंतर मेहंदी पावडर वाटीत भिजवून माचीसच्या काडीने हातावर नक्षीकाम व्हायचे. जास्तच बारीक नक्षी हवी असल्यास खराट्याची काडी वापरत असू. सकाळी उठल्याबरोबर कोणाच्या हातावरली मेहंदी जास्त रंगली याबाबत स्पर्धा असायची. अखेर दिवाळीचा दिवस उगवायचा ज्याची प्रचंड आतुरतेने, उत्सुकतेने वाट बघत असायचो. रात्री आईने घरासमोरील भला मोठ्ठा ओटा शेणाने सारवलेला असायचा.

त्यावर बहीण सकाळी रांगोळी काढायची आणि घर अधिकच खुलून दिसायचं. सकाळी घासून अंघोळ घालण्याचा कार्यक्रम आई न चुकता पार पाडायची, त्यानंतर केसांना खसखसून चपचपीत  तेल लावून फणीने विंचरून, बो बांधून त्यावर शेवंतीची वेणी सजायची. मग पाचही बहिणी एकाच ताग्यातून शिवलेल्या फ्रॉकमध्ये गल्लीभर आनंदाने मिरायचो. खरी मज्जा तर संध्याकाळी यायची जेव्हा गल्लीत फोटोवाला यायचा. ‘गंधपावडर’ करून अंगणातील तुळशी वृंदावनाशेजारी फुललेल्या झेंडूत एकमेव ‘फॅमिली फोटो’ क्लीक व्हायचा. पुढला एकमेव क्लीक पुन्हा पुढल्या दिवाळीतच व्हायचा.

भारंभार फोटो नसायचे तेव्हा आजसारखे; म्हणून अप्रूप होतं साऱ्याच गोष्टींचं. दुसऱ्यादिवशी सकाळी शेजारीपाजारी फराळाची ताटं जायची आणि यायचीदेखील! मग कुणाच्या घरचा कोणता पदार्थ रुचकर असतो हे कळायचे. आजही दिवाळीची चाहुल लागताच सारं झरझर आठवतं अगदी कालपरवा घडल्यासारखं.

आज वर्षभरात कितीतरी वेळा निमित्ताशिवाय नवीन कपडे घेतले जातात पण तो आनंद नाहीच जो त्या वर्षातल्या एका ड्रेसने मिळायचा. दिवाळीचा सारा फराळ हल्ली वर्षभर मिळतो दुकानात, पण ‘ती’ चव कुठेय त्याला? मेहंदीच्या कोनाला माचीसच्या काडीने काढलेल्या त्या मेहंदीचा रंग चढतच नाही. घराला अंगण नाही, सडा-सारवण नाही आणि रांगोळीही नाही. केसात वेणी माळून कितीतरी दशकं उलटलीत. या दिवाळीला मात्र मी मुद्दामहून माळणार आहे केसात वेणी. बघू या! तोच सुगंध सापडतो का पुन्हा इतक्या वर्षांनी?

कितीही काळ लोटला तरीही मनःपटलावर कोरलेली बालपणातली ‘ती’ दिवाळी कधीच पुसली जाणार नाही! खुणावत राहील, रेंगाळत राहील, सुखावत राहील, आजन्म आठवत राहील आणि  नेणिवेत तेवढीच टवटवीत राहील हे मात्र निश्चित…..

प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, (साहित्यिक, वक्ता, एकपात्री कलाकार), लासलगाव (नाशिक)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!