Type to search

दिवाळी - ब्लॉग

Blog : साठवणीतल्या आठवणी…!

Share

दिवाळी – अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा उत्सव – किती साधी, सोपी, सुंदर संकल्पना! आपण त्याला नरकासुराच्या वधाचे रूप देऊया, रावणवधानंतर परतणाऱ्या रामाच्या अयोध्येमधील स्वागताचं रूप देऊया किंवा आणखी काही म्हणून उद्बोधूया, शेवटी ह्या सणाचे महत्त्व मूलभूत रूपाने फार साधं आहे – प्रकाशाने अंधारावर, म्हणजेच चांगल्याने वाईटावर, सत्कृत्याने दुष्कृत्यावर, ज्ञानाने अज्ञानावर, शांतीने अशांतातेवर, आशेने निराशेवर केलेली मात. मानवधर्माचा हा मूलभूत आशावाद साजरा करणारा हा सुंदर सण.  हा सण माझा खास आवडीचा.  दिवाळीच्या नावानेच मनाला आनंदाची आणि उत्साहाची भरारी येते, एक चैतन्य जाणवतं. मला बरेच वेळा कुणी कुणी विचारलं आहे की दिवाळीचा एवढा उत्साह कुठून येतो? याचं उत्तर माझ्या बालपणात लपलेलं आहे. त्या लहानपणीच्या आठवणींच्या साठवणीतलं हे एक पान.

दिवाळी दरवर्षीच येते आणि दरवर्षी काही ना काही आठवणी ठेवून जाते. पण तरीही दिवाळी म्हटली की सगळ्यांना लहानपणीच्याच आठवणी फार येतात. जणू काही तरुणपणी दिवाळी साजरी करतच नाहीत आणि लहानपणीची दिवाळी म्हणजे पहिले आठवतात ते खूप सारे फटाके. हल्ली आम्ही मोठे झालो आहोत आणि बरेचसे सुजाण नागरिक झालो आहोत असा आमचा समज झाल्याने आम्ही फटाके फोडत नाही कारण या सार्‍यांमुळे किती ध्वनी-प्रदूषण होते, वायू-प्रदूषण होते हे आम्हाला उशीराने का होईना कळून चुकले आहे. म्हणून मग आम्ही ‘दुरून फटाके साजरे’ असा संकल्प वगैरे करतो. पण लहान असताना जे फटाके फोडले ते अजुनही आठवतात.

तेव्हा सकाळीच लवकर आंघोळ करून पिशवी भरून फटाके घ्यायचो आणि सर्वत्र हिंडत ते फोडायचो. त्यात भुईचक्र, अनार, फुलबाजे, नाग-गोळ्या,लक्ष्मीबार, रश्शी-बॉम्ब आणि काय काय असायचे. सकाळी भरलेली पिशवी दुपारपर्यंत संपवायचीच असा अलिखित नियम, म्हणून मग सारे फटाके संपवूनच विजयीवीर घरी परतत. मला तरी त्या फटाक्यांच्या माळा लावण्यापेक्षा त्या लवंगीबार तोडून लावण्यातच फार मज्जा वाटायची.त्याला मोडून त्याचे चक्र किंवा पाऊस लावण्याकडे ओढा जास्त. आणि इतके सारे फटाके मिळून ही न फुटलेले फटाके शोधायचे आणि तेही फोडायाचे. त्याची दारू गोळा करून पेटवून देणे हा फटाके संपल्यावर या कार्यक्रमाची सांगता करणारा उपक्रम

तसे सकाळी खूप सारे फटाके फोडले तरी रात्री त्याची पुनरावृत्ती व्हायचीच. तेव्हा सर्व घरांना लागलेले दिवे, आकाश-कंदिल, रांगोळ्या आणि आकाशात रॉकेट्सची होणारी रोषणाई हे पाहताना रात्र पुरत नसे. पण जसजसे मोठे झालो तसे फटाक्यांपासून दुरावलोच.हल्ली दिवाळी आली की मित्रांसोबत शॉपिंग करणे आणि पार्ट्या करणे हेच उद्योग उरले आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नटून-थटून बाहेर पडणे होत नाही. हल्ली आम्ही मोबाईल आणि मेलवर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवतो. तसे पारंपरिक वेशभूषा करून बाहेर जाणे झालेच तर ते कॉलेजमध्ये किंवा ऑफीसमध्ये असणार्‍या दिवाळी पार्टीलाच होते. मग खूप सारे फोटो काढून ते ओर्कुट, फेसबुक वर टाकले जातात. पण लहानपनीचे दिवाळीचे फोटो पाहताना आजचे फोटो त्यापुढे फिकेच पडतात.

दिवाळीबद्दल अजुन एक आवडणारी गोष्ट म्हणजे- दिवाळीचा फराळ. या दिवसात घरोघरी दिवाळीचा फराळ चापण्यात जी मजा आहे ती एरवी कुठे आहे? म्हणून मग आलेला फराळ फस्त करणे हा आवडता उद्योग. हल्ली रेडीमेड फराळ ही मिळतो आहे पण घरी सर्वांनी मिळून केलेल्या गरमागरम फराळाची लज्जत काय सांगावी ? पहिला लाडू देवापुढे ठेवला की पाठोपाठ तीन-चार लाडू पोटात जातातच. लहानपणी घरातले सगळेजण फराळ बनवण्याची मोहिम हाती घ्यायचो तेव्हा शाळेला भरपूर सुट्टी पण असायची, आता दिवाळीला सुट्ट्या मिळतात याचेच फार कौतुक वाटते.

आत्ता ही दिवाळीची सुट्टी  मिळाली म्हणून लिहीण्याचा योग आला.  मोठे झाल्यापासून दिवाळीची सुट्टी तर फारच मिस करतेय. दिवाळीचे पाच दिवस संपले तरी काही दिवस फक्त सुट्टी म्हणून अजुन मजा करायला मिळायची ती मिळणे तर दुरापास्तच झाले आहे. दिवाळीच्या सुट्टीत अवांतर वाचन ( जे शाळेत नेहमी करायला सांगितले जायचे) करणे फार आवडायचे. शाळेत असताना किमान दिवाळी अंक तरी वाचले जायचे. आता अभ्यासाची पुस्तकेच धूळ खात आहेत. सध्या झालेच तर वीकेंडला एखादी पिकनिक प्लॅन होते. दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न. पण आयुष्य खूप धकाधकीचे होत चालले आहे तेथे हे असेच चालायचे.

दिवाळी खूप झपाट्याने बदलत चालली आहे असेच वाटू लागले आहे. शाळेत शेवटचा पेपर देण्याची वाट पाहणारे आपण आता सॅलरी आणि बोनसच्या चेकची वाट पाहु लागलोय हे जाणवले तेव्हाच ते लहानपनीचे गाव फार दूर राहिल्याचे लक्षात आले. आता ही जमेल तितकी, जमेल त्या परीने दिवाळी एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो आहेच पण राहून राहून वाटते-काहीतरी मिस होतेय यार.

दर वर्षी दिवाळीची तयारी करायला घेतली की पूर्वी केलेली मजा आजही माझी दिवाळी उजाळून काढते. आयुष्य म्हणजे हेच नाही का – आनंदात वेळ घालवणं, येणाऱ्या क्षणांवर आनंदाचा लेप चढवणं, आणि या सोनेरी क्षणांनी सुंदर आठवणी निर्माण करून भविष्याचेही कित्येक क्षण सोनेरी बनवणं !  या आठवणी तयार करायला लागतं काय? फार काही नाही – आपली माणसं, त्या माणसांबरोबर घालवायला वेळ, आणि त्या वेळात केलेली साधी-सोपी मजा.  बस्स.  पैसा-अडका, सोनं-रुपं, कशाची गरज नाही.

आजच्या जमान्यात हेच दुर्मिळ झालं आहे आपल्या माणसांचं जवळ असणं, माणसं असली तरी त्यांना आणि आपल्याला वेळ असणं, आणि वेळ असेल तरी एकमेकांच्या सहवासातच बाकी काहीही props किंवा apps शिवाय मजा करता येणं हे सर्व एवढं सोपं राहिलेलं नाही.  पण अश्याच छोट्या छोट्या गोष्टींच्या आठवणी बनतात आणि अश्या आठवणीच्या साठवणीनेच जीवन समृद्ध होतं.  जुन्या आठवणी ताज्या करून माझं मन ताजंतवानं झालं!

सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…!

मृणाल पाटील,  बी.वाय.के.कॉलेज

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!