रिमांड बळी : रिमांड होममधील सुरक्षा चव्हाट्यावर

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोर्टाच्या कचाट्यातून सुटल्यानंतर तो घरी परतला खरा पण घरीही धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे कोर्टाच्या मदतीने तो पुन्हा रिमांड होममध्ये परतला. अनपड असलेल्या त्याने मित्राच्या मदतीने ‘मी मरणार आहे’ अशी चिठ्ठी लिहून घेतली, अन् आज पहाटेच्या सुमारास त्याने रिमांड होमच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली.
अमन (बदलेले नाव) मुळचा नेवासा तालुक्यातील. पैशाच्या वादातून त्याने सख्ख्या मेहुण्याचा खून केला. अल्पवयीन असल्याने त्याला रिमांड होममध्ये ठेवलं गेलं. तेथून तो जामिनावर सुटला. दरम्यान त्याचं कुटुंब नगरमध्ये स्थलांतर झालं होतं. रेल्वेस्टेशन भागातील झोपडपट्टीत तो राहू लागला. घरी परतल्यानंतर त्याला धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे आपल्या जीविताला धोका असल्याचा अर्ज त्रयाने ऑगस्टमध्ये केला.
त्यानुसार कोर्टाने त्याचा सुरक्षेची काळजी घेत पुन्हा रिमांड होममध्ये पाठविले. त्याला लिहिता वाचताही येत नव्हतं. रिमांड होममधील मित्राकरवी त्याने रात्री चिठ्ठी लिहून घेतली. त्यात ‘मी मरणार आहे’ असा उल्लेख आहे. त्यानंतर पहाटे पाच वाजेच्या दरम्यान त्याने आवारातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी रिमांड होममध्ये जाऊन चौकशी करत तपास सुरू केला आहे. त्याच्याकडील चिठ्ठीही पोलिसांनी हस्तगत केली आहे.

रिमांड होममधील सुरक्षा चव्हाट्यावर
रिमांड होममध्ये विविध गुन्ह्यातील अल्पवयीन मुलं-मुलींना ठेवले जाते. आज मितीला तेथे 101 मुलं-मुली आहेत. दिवसा तीन तर रात्री फक्त एक कर्मचारी त्यांची सुरक्षेसाठी नियुक्तीस असतो. इतक्या मुलांची सुरक्षा तेही रात्रीच्यावेळी एक सुरक्षारक्षक कसा काय घेऊ शकतो असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुले पळून जाण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. आता तर थेट आत्महत्याचा प्रकार समोर आल्याने रिमांड होममधील मुलांची सुरक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

LEAVE A REPLY

*