धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणावर रात्रीतून हातोडा

0

मनपाची कारवाई : पोलीस बंदोबस्तात नागरिकांचा विरोध झुगारला

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरात शनिवारी रात्रीपासून महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा कारवाई सुरू केली आहे. महापालिका कर्मचार्‍यांच्या पथकाने केडगावसह बसस्थानक परिसरातील पाच मंदिरांवर कारवाई करून ती भुईसपाट केली. दरम्यान, दोन ठिकाणी स्थानिकांनी कारवाईला विरोध केला. मात्र, मनपा अतिक्रमण विरोधी विभागप्रमुख सुरेश इथापे यांनी दबाव झुगारून कारवाई पार पाडली.
शहरात रस्त्याला अडथळा ठरणार्‍या 1960 नंतरच्या धार्मिक स्थळांवर मागील आठवड्यात कारवाईला सुरूवात झाली. त्यात शिवाजीनगर-कल्याण रोड, बालिकाश्रम रस्ता व सावेडी उपनगरातील 7 मंदिरांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, मनपाच्या सर्वेक्षणाला हिंदुत्ववादी संघटना, नगरसेवक, अनेक स्थानिकांनी आक्षेप घेतल्याने कारवाई थंडावली होती.
शनिवारी रात्री 12 वाजता सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, मनपा उपायुक्त विक्रम दराडे, अतिक्रमण विरोधी विभागप्रमुख सुरेश इथापे, प्रभाग अधिकारी नाना गोसावी, अशोक साबळे, अंबादास सोनवणे, जितेंद्र सारसर आदी महापालिका व पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत केडगाव-नेप्ती रोडवरील शितळादेवी व म्हसोबा मंदिरावर एकाच वेळी कारवाई सुरू करून ती हटविण्यात आली. त्यानंतर सोनेवाडी रस्त्यावर असलेले शितळादेवी मंदिर हटविण्यात आले.
केडगांव देवी मंदिराजवळील लक्ष्मी माता मंदिरावरील कारवाई करण्यात आली. त्यानंतर स्वस्तिक चौक बसस्थानका शेजारील रस्त्यावर असलेले दत्त मंदिर हटविण्यात आले. मंदिराचे आरसीसी बांधकाम असल्याने दोन जेसीबींच्या सहाय्याने कारवाई झाली. दरम्यान, लालटाकी येथील साई मंदिर व वैष्णवी माता मंदिरातील मूर्त्या नागरिकांनी स्वत:हून काढून घेतल्या आहेत. तर सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळील मंदिरातील मूर्ती स्वत:हून काढण्यासाठी तेथील नागरिकांनी तयारी दर्शविली आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत नागरिकांनी, मंदिराच्या संबंधितांनी स्वत:हून न काढल्यास कारवाई केली जाईल, असे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*