Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याअतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीची दुसर्‍या टप्प्यातील 111 कोटीची मदत जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. मदतीपासून वंचित असलेल्या दोन लाख चार हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर ही मदत वर्ग केली जाणार आहे.राज्य शासनाकडून उशीरा का होईना ही मदत प्राप्त झाल्याने शेतकर्‍यांना नववर्षात मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

जून व जुलै महिन्यात पाठ फिरवणार्‍या पावसाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यासह जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. नाशिक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली नसली तरी अनेक पिकांना अतिवृष्टिचा जोरदार तडाखा बसला. कांदा, मका, भात, ज्वारी, सोयाबीन ही पिके अतिवृष्टीमुळे आडवी झाली. त्याचबरोबर भाजिपाल्याही फटका बसला. एकूणच हातातोंडाशी आलेले पिक आडवे झाल्याने शेतकरी संकटात सापडला. राज्य शासनाने युध्दपातळीवर पंचनामे पूर्ण करुन हेक्टरी दहा हजार व फळबागांना 25 हजार मदत जाहिर करत दिवाळीपुर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा केले जाईल, असे आश्वासन दिले होते.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3 लाख 66 हजार 830 शेतकर्‍यांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण करत नुकसान भरपाईसाठी 242 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला होता. दिवाळीनंतर त्यापैकी 110 कोटीची मदत जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. एक लाख 62 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर ही मदत जमा करण्यात आली. मात्र, डिसेंबर महिना उजाडला तरी दुसर्‍या टप्प्यातील मदत प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे दोन लाखांहून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित होते.

मदतीपासून वंचित रहावे लागल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची दिवाळी कडुच गेली. करोना संकटामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याने मदत प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. अखेर जानेवारीच्या अखेरीस का होईना ही मदत बळीराजाला दिली आहे. 111 कोटी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. युध्दपातळीवर ही मदत वंचित शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम सुरु आहे.

तालुकानिहाय दुसर्‍या टप्प्यातील मदत

बागलाण – 20094309 देवळा – 1356650 येवला – 109151182 चांदवड – 179245957 दिंडोरी – 1371699 नाशिक – 231000 सिन्नर – 1996148 कळवण – 17300000 त्र्यंबकेश्वर – 31876700 पेठ – 29716300 सुरगाणा – 36227160 निफाड – 3942903 इगतपुरी – 38715623 मालेगाव – 458878013 नांदगाव – 170270758

एकूण – 1112584002

- Advertisment -

ताज्या बातम्या