Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदिलासा! 97 टक्के पुणे शहर खुले

दिलासा! 97 टक्के पुणे शहर खुले

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहरात ज्या भागांमध्ये करोनाचे रुग्ण नाही, त्या परिसरांत विविध सवलती देण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील 84 चौरस किमी प्रतिबंधित (कंटेन्मेंट झोन) क्षेत्र कमी करून ते आता 10 चौरस किमीपर्यंत कमी केले आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

- Advertisement -

या निर्णयानुसार 97 टक्के पुणे शहर खुले करण्यात आले असून या भागातील नागरिकांना दुचाकी व चारचाकींचा वापर करता येणार आहे. त्यांना पेट्रोल डिझेलही उपलब्ध होणार आहे. यासोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह अन्य दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक गल्लीतील पाच दुकानं उघडी ठेवता येतील.पण पुणेकरांना सोशल डिस्टंट पाळावे लागेल, असे गायकवाड यांनी सपष्ट केले.

यावेळी आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे, रिक्षा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टला परवानगी नाही. मोलकरीन अर्थात मेट सर्विसला परवानगी पण नियम पाळून दिली आहे. मंदिरं उघडू शकता. पण सार्वजनिक प्रार्थनेला परवानगी नाही गर्दी टाळावी. तसेच वाईनशॉप परवानगीचा घोळ लवकरच मिटेल, पण सार्वजनिक ठिकाणी अकारण गर्दी आणि गोंधळ वाढला तर पुन्हा निर्बंध लादले जाऊ शकतात. हे देखील पुणेकरांनी लक्षात ठेवावे. कलेक्टर त्यासंबंधीचे योग्य ते आदेश काढतील.
करोनावर आतापर्यंत सात कोटींचा खर्च झालेला आहे. करोना संक्रमित भागातील लोक स्थलांतरास फारसे इच्छूक नाहीत. यावेळी आयुक्त शेखर गायकवाड यांनी खंत व्यक्त केली. यापुढे या एसआरएचा प्रस्ताव पालिकाच देईल,असेही पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यात करोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता झोपडपट्ट्या, दाटीवाटीच्या भागात सर्वाधिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. हा भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सवलती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. पुण्यामध्ये नागरिकांना आवश्यक गोष्टी टप्प्याटप्प्याने खुल्या केल्या जाणार आहेत. अत्यावश्यक सेवांसाठी नागरिकांना गरजेनुसार वाहन घेऊन फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच बांधकाम मजूर जर साईटवरच राहणार असतील तर अशा बांधकाम प्रकल्पांना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ई-कॉमर्सअंतर्गत येणा-या आस्थापनांना सवलत देण्यात येणार आहे.

खुल्या करण्यात आलेल्या भागातील वैयक्तिक दुकानांना प्राधान्य देण्यात आले असून जिवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. ज्या रस्त्यावर सलग दुकाने आहेत अशा ठिकाणी एकाआड एक अशी पाच दुकाने सुरु ठेवता येणार आहेत.

नव्या लॉकडाऊनला महापौरांचा विरोध
दरम्यान, पुणे शहरात नव्याने लागू केलेल्या लॉकडाऊनला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध केला असून, त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
सोमवारी सकाळपासून पुण्यातील सर्वच रस्त्यावर असणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत संपूर्ण शहरात असाव्यात. नव्या आदेशानुसार 10 ते 7 वेळ असल्याने लोक दिवसभरही बाहेर असू शकतील, यावर नियंत्रण कसे अन्नणार ? असा सवालही महापौरांनी उपस्थित केला आहे.
पुणेकरांनी पहिले दोन लॉकडाऊन व्यवस्थित पाळले असताना आणि रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची शक्यता असताना नवे आदेश शहराला परवडणारे नाहीत. सव्वा महिन्यात पुण्यातील परिस्थिती आटोक्यात आहे. त्यासाठी पोलीस, प्रशासन, आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन पूर्वी प्रमाणेच सुरु ठेवा. आज (सोमवारी) हजारो नागरिक रस्त्यावर आल्याने आपला उद्देश सफल ठरताना दिसत नाही, असेही महापौर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या