Friday, April 26, 2024
Homeनाशिकग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करावे; उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे

ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करावे; उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे

नाशिक । प्रतिनिधी

दूषित पाण्यामुळे कुठल्याही प्रकारचे गंभीर आजार होऊ नये,यासाठी ग्रामपंचायतीने नियमित व दैनंदिन पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
ग्रामस्थांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी असून ग्रामपंचायत हद्दीत असणारे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत परिसर यांची नियमित साफसफाई त्याचप्रमाणे रासायनिक आणि जैविक पाणी नमुना तसेच टीसीएल तपासणी करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

यामुळे निश्चितच आपण पाण्यामुळे होण्यार्‍या साथरोगांवर प्रतिबंध घालू शकतो.जिल्ह्यामध्ये एकूण 7329 स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले असून त्यामध्ये 154 ग्रामपंचायतीना मध्यम जोखीम प्रमाणपत्र( पिवळे कार्ड) देण्यात आले आहे. पिवळ्या कार्डच्या त्रुटी त्वरित दूर करून त्याचे हिरव्या कार्डमध्ये रूपांतर करण्याबाबत ग्रामपंचायत यंत्रणेला शेळकंदे यांनी निर्देश दिले जिल्ह्यात मान्सूनपश्चात रासायनिक तपासणी अभियान दिनांक 1 ऑक्टोबर पासून सुरु झालेले असून आरोग्य व ग्रामपंचायत यांच्यामार्फत मोबाईल अ‍ॅप्लीकेशन द्वारे 90टक्के जिओ टगिंग करण्यात आले.

या आढावा बैठकीत आदर्श ग्राम किकवारी (खुर्द)ता.सटाणा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच केदा बापू काकुळते यांनी ग्रामीण भागातील नळ पाणीपुरवठा योजनासाठी दैनंदिन पाणी शुद्धीकरणाकरिता क्लोरीनेटर नावाचे उपकरण तयार केले असून त्याद्वारे पाण्याच्या टाकीवर न चढता टाकीच्या खालीच पाण्याचे टी.सी.एल.पावडरद्वारे शुद्धीकरण करता येते. सदर उपकरण कशा पद्धतीने वापरायला पाहिजे यावर केदा बापू काकुळते यांनी सादरीकरणाद्वारे उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

बैठकीला भूजल विकास सर्वेक्षणचे जीवन बेडवाल,आरोग्य विभागाचे डॉ.पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रतिनिधी, तालुका स्तरावरील विस्तार अधिकारी आरोग्य आणि ग्रामपंचायत, उप विभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामलेखा समन्वयक यांच्यासह पाणी स्वच्छता कक्षातील तज्ज्ञ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या