Thursday, April 25, 2024
Homeनाशिकटोलनाक्यावरील सवलतींसाठी नोंदणी आवश्यक; स्थानिक वाहनधारकांसाठी स्वतंत्र मार्गिकांचे नियोजन

टोलनाक्यावरील सवलतींसाठी नोंदणी आवश्यक; स्थानिक वाहनधारकांसाठी स्वतंत्र मार्गिकांचे नियोजन

नाशिक । अजित देसाई

देशभरातील टोलनाक्यावर 15 डिसेंबरपासून फास्टटॅगद्वारे टोल आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील सर्वच मार्गिका कॅशलेस असणार आहेत. असे असले तरी टोलनाक्यांच्या परिसरसातील 20 किलो मीटर त्रिज्येत येणार्‍या गावांतील वाहनधारकांसाठी सवलती सुरु ठेवण्यासाठी टोलनाक्यांवर विशेष नोंदणी करावी लागणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने 1 डिसेंबरपासुन सर्वच टोलनाक्यावर फास्टटॅगद्वारे वाहनांना टोल भरणे सक्तीचे केले आहे. मात्र, या निर्णयाला दोन आठवडे स्थगिती देत 15 डिसेंबरपासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. टोलनाक्यावर पैसे भरण्यासाठीचा वेळ वाचावा या हेतूने फास्टटॅगचा पर्याय सर्वच वाहनांसाठी वापरला जाणार आहे. टोलनाक्यावर वेग काहीसा कमी करून वाहन न थांबता पुढे जाईल व अवघ्या काही सेकंदात डिजिटल तंत्रज्ञानाने तुमच्या वाहनाचा टोल भरला गेल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त होईल.

फास्टटॅगद्वारे टोल चुकता होणार असला तरी टोलनाक्याच्या परिसरातील स्थानिक वाहनधारकांना दिल्या जाणार्‍या सवलतीचे काय? हा प्रश्न उभा राहिला आहे. आज जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव, चांदवड येथील टोलनाक्यावरून 20 किमीच्या आतील वाहनांना स्थानिक म्हणून सवलत असून त्यांना कोणतेही शुल्क न भरता जाण्या-येण्यास मुभा आहे. अर्थात यासाठी संबंधित टोल प्रशासनाकडून स्थानिक म्हणून या वाहनांची नोंद करण्यात आली आहे.

तर इगतपुरी येथील टोल प्लाझावर मात्र स्थानिक वाहने म्हणून देण्यात येणारी निःशुल्क सवलत काढून घेण्यात आल्याने व स्थानिक म्हणून गणल्या जाणार्‍या वाहनांसाठी ठराविक शुल्क आकारणी करण्यात येत असल्याने नाराजीचा सूर आहे. नाशिक पुणे महामार्गावर असणार्‍या शिंदे येथील टोल प्लाझावर देखील 20 किमी परिसरातील वाहनांना स्थानिक म्हणून निम्मी सवलत देण्यात येत आहे. इगतपुरी व शिंदे येथील टोल नाक्यावर चांदवड, पिंपळगाव प्रमाणे स्थानिक वाहनांना निःशुल्क सवलत मिळावी ही मागणी होत असताना आता फास्टटॅग आल्याने स्थानिक वाहनधारकांच्या संतापात अधिकची भर पडली आहे.

येत्या दोन दिवसांत फास्ट टॅग चा वापर करून टोल भरणे अनिवार्य झाल्यावर शिंदे व ईगतपुरीतील टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांचा गोंधळ उडणार असला तरी स्थानिक म्हणून या दोन्ही ठिकाणी मिळणार्‍या सवलती कायम राहतील असते टोल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्यासाठी टोलनाक्यावरील यंत्रणेकडे आवश्यक पुरावे देऊन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. अशी नोंदणी केलेले वाहन टोलनाका ओलांडत असताना स्थानिक म्हणून मिळणार्‍या सवलतीच्या दरानुसारच फास्टटॅगद्वारे आकारणीस पात्र राहतील.

पिंपळगावला 20 हजार स्थानिक वाहनांची नोंदणी

पिंपळगाव टोलनाक्याच्या परिसरातील 20 किमी त्रिज्येत असणार्‍या गावांमधील वाहनांना स्थानिक म्हणून सवलत देण्यात आली आहे. या वाहनांची टोलनाक्यावर नोंदणी करण्यात आली असून सुमारे 20 हजार वाहनधारकाना वर्षभरापूर्वीच फास्टटॅग देण्यात आले आहेत. या वाहनांना टोल माफ असला तरी फास्टटॅग प्रणालीत त्यापद्धतीने मोड ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सदर वाहन ईटीसी मार्गिकेतून विनासायास व न थांबता मार्गक्रमण करू शकते अशी माहिती न्हाई ( राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) चे शशांक आडके यांनी दिली. वडपे ते गोंदे प्रोजेक्ट अंतर्गत असणार्‍या इगतपुरी येथील टोल नाक्यावरून या पूर्वी स्थानिक वाहनांसाठी टोल आकारणी नव्हती.

मात्र, सुधारित नियमावलीनुसार आता स्थानिक वाहनांना इतर वाहनांच्या तुलनेत 12.50 टक्के इतका टोल भरावा लागणार आहे. याचा अर्थ स्थानिक जीप अथवा कारला साधारणपणे 15 इतका टोल भरावा लागेल. इगतपुरीतील वाहनधारकांना स्थानिक म्हणून सवलत मिळवण्यासाठी वाहनाची नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी वाहनमालकाचे आधारकार्ड, वाहनाचे आरसी बुक सादर करावे लागेल. त्यावरून सदर वाहन स्थानिक असल्याची खातरजमा करण्यात येईल व फास्टटॅगच्या मोडवर त्या वाहनाचा तसा उल्लेख केला जाईल असे आडके यांनी सांगितले.

शिंदे टोलनाक्यावर नोंदणीची व्यवस्था

पुणे महामार्गावरील शिंदे येथील टोलनाक्यावर 20 किमीच्या परिसरातील वाहनांसाठी स्थानिक म्हणून सवलत आहे. हा टोलनाका सुरु झाल्यावर नियमित स्थानिक वाहनधारकांना मासिक पासेस देण्यात आले होते. फास्टटॅग अनिवार्य झाल्यावर स्थानिक म्हणून नोंदणी असणार्‍या वाहनासाठी पूर्वीचीच सवलत लागू राहील. तर ज्या वाहनधारकांनी या सवलतीसाठी वाहनाचे आरसी बुक व मालकाचे आधारकार्ड सादर करून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन टोल प्लाझा चे व्यवस्थापक विठ्ठल पाटील यांनी केले आहे. वाहनाची नोंदणी करताना वाहनमालकाचा आरसी बुक आणि आधार वरील पत्ता एकच असणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या